राष्ट्रवादीच्या कोट्यातील राज्यसभा जागेवर नवनीत राणांची नजर; भुजबळांसह अनेक दिग्गज नेत्यांची नावेही चर्चेत
विशेष म्हणजे या जागेसाठी माजी खासदार नवनीत राणा यांनी जोरदार प्रयत्न सुरू केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Navneet Rana eyes Rajya Sabha seat : राज्यात एकीकडे विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आता राज्यसभेच्या पोटनिवडणुकीच्या हालचालींना देखील वेग आला आहे. देशभरातील राज्यसभेच्या 24 रिक्त जागांपैकी तसेच काही पोटनिवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, महाराष्ट्रातील एका महत्वाच्या जागेकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.
आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम या राज्यांमधील राज्यसभा जागांसाठी निवडणूक होणार आहेत. यासोबतच महाराष्ट्र आणि तामिळनाडूतील प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार असून 18 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रातील ही जागा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झाली आहे. त्यामुळे या जागेवर कोणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे या जागेसाठी माजी खासदार नवनीत राणा यांनी जोरदार प्रयत्न सुरू केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, नवनीत राणा यांनी नुकतीच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. त्याचबरोबर राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या सलग भेटींमुळे त्यांच्या राज्यसभा प्रवेशाच्या शक्यतांबाबत चर्चा अधिकच तीव्र झाली आहे.
पुढच्या पिढीला हिरवागार महाराष्ट्र देणार की काँक्रीटचं जंगल? पर्यावरण दिनी राज ठाकरेंचा थेट सवाल
महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागावाटप आणि राजकीय समन्वयाच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची मानली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून ही जागा भरली जाण्याची शक्यता असल्याने पक्ष नेतृत्व कोणावर विश्वास दाखवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षाबाहेरील चेहऱ्याला संधी देण्यात येणार की पक्षातील अनुभवी नेत्यालाच राज्यसभेत पाठवले जाणार, याचा निर्णय आगामी काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावे देखील चर्चेत आहेत. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव सुरूवातीपासूनच चर्चेत असून त्यांच्यासोबतच सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक आणि प्रमोद हिंदुराव यांच्या देखील नावांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे उमेदवारीच्या शर्यतीत अनेक दिग्गज नेते असल्याचे चित्र दिसत आहे.
राज्यसभेची ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी उमेदवारीवरून पडद्यामागे मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेची ही जागा केवळ संसदीय प्रतिनिधित्वापुरती मर्यादित नसून भविष्यातील राजकीय समीकरणांची चाचणी मानली जात आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व अखेर कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करते, नवनीत राणा यांना महायुतीकडून पाठबळ मिळणार का, की पक्षातीलच एखाद्या ज्येष्ठ नेत्याला संधी दिली जाते, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आगामी काही दिवसांत या राजकीय सस्पेन्सवरचा पडदा उठण्याची शक्यता असून राज्यसभेच्या या जागेभोवतीची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.