भाजपला धक्का द्यायचाय, पवारांनी सांगितला 77 चा किस्सा; विरोधकांना दिलं ‘टॉनिक’

भाजपला धक्का द्यायचाय, पवारांनी सांगितला 77 चा किस्सा; विरोधकांना दिलं ‘टॉनिक’

Sharad Pawar on Opposition Meeting : भाजपला केंद्रातील सत्तेतून बेदखल करण्यासाठी विरोधी एकतेचा प्रयोग देशात सुरू आहे. याकामी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पुढाकार घेतला आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक येत्या 23 जून रोजी पटना येथे होणार आहे. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठे विधान केले आहे.

पवार म्हणाले, आम्ही या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहोत. तसेच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र येत निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते.

कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे अन् प्रफुल्ल पटेल यांची निवड का? शरद पवारांनी सांगितलं कारण

ते पुढे म्हणाले, देशातील विरोधी पक्षांचे लोक एकत्र येत या बैठकीला उपस्थित राहतील असा विश्वास वाटतो. देशात परिवर्तन येईल आणि परिवर्तन दिसेल. मला आठवतं 1977 मध्ये अशीच परिस्थिती होती. समोर एकही नेता नव्हता. तरी लोकांनी मात्र बदल करण्याचे ठरवले होते. निवडणुकीच्या वेळी देशात नवे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर जनता पक्ष सत्तेत आला. अशीच परिस्थिती आता देशात दिसत आहे. त्यामुळे विविध विचारसरणीच्या पक्षांना एकत्र आणून किमान समान कार्यक्रम तयार करून पुढे जाण्याची गरज आहे, असे पवार म्हणाले. ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची ताकद जास्त आहे तेथे सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन लढणार आहोत, असे पवार म्हणाले.

हे नेते राहणार उपस्थित 

दरम्यान, देशातील प्रमुख विरोधी पक्षांची बैठक येत्या 23 जून रोजी निश्चित करण्यात आली आहे. याआधी ही बैठक 12 जूनला होणार होती. मात्र, काही राजकीय नेत्यांसाठी हा दिवस सोयीचा नव्हता म्हणून बैठकीची तारीख बदलण्यात आल्याचे सांगितले गेले होते.

त्यानंतर आता 23 जून रोजी पटणा शहरात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी देशातील विरोधी पक्षांचे प्रमुख नेते सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातून शरद पवार, उद्धव ठाकरे या बैठकीत सहभागी होणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन आदींसह अन्य प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube