राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी छगन भुजबळांचा नाव निश्चित?, नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, पार्थ पवार उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर जागेवर 18 जूनला पोटनिवडणूक होत आहे. (Election) या उमेदवारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शनिवारी दिवसभरात वेगवान घडामोडी घडत आहेत. राज्यसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे शनिवारी सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या दोन बैठका पार पडल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने उमेदवाराच्या नावाबाबत चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावेळी फडणवीस यांनी भाजप पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करून निर्णय कळवणार असल्याचं सांगितलं. त्यामुळं आता उत्सुकता शिगेला पोहचली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, पार्थ पवार उपस्थित होते.
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेसाठी इच्छुक असलेल्या प्रमोद हिंदुराव, मंत्री छगन भुजबळ, अविनाश आदिक, समीर भुजबळ यांच्या नावावर चर्चा झाली. यापैकी छगन भुजबळ यांची उमेदवारी फायनल मानली जात आहे. मात्र, त्यांनी त्यांच्याकडील मंत्रीपद पुतण्या समीर यांना देण्याची मागणी केल्याने राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने शनिवारी दुपारी फडणवीस यांची भेट घेतली.
छगन भुजबळ हे केंद्रात जात असले तरी राज्यातील मंत्रिपद कुटुंबातील व्यक्तीलाच मिळावे, असा आग्रह धरला आहे. केंद्रात छगन भुजबळ तर राज्यात छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाच्या आणि आमदारकीच्या जागेवर समीर भुजबळ यांना संधी देण्यात यावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शनिवारी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली.
त्यानंतर फडणवीस यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने उमेदवाराच्या नावाबाबत चर्चा केली. त्यावेळी फडणवीस यांनी भाजप पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करून निर्णय कळवणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नेत्याची छगन भुजबळ यांच्या बंगल्यावर कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यामध्ये पुन्हा एकदा इच्छुक असलेल्या नेतेमंडळीच्या नावावर चर्चा पार पडली. या बैठकीतील नावांची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना कळवण्यात आली.