NCP : तुम्हाला काय कमी केलं होतं? मिळालेली पदं सांगत रोहित पवारांचा वळसे पाटलांना सवाल
मुंबई : तुमच्यावर पवार साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. तुम्हाला काय कमी केलं होतं? अजून काय पाहिजे होतं? असा सवाल करत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी बंडखोर आमदार दिलीप वळसे पाटील यांना जाब विचारला.शरद पवार यांनी आजपर्यंत दिलीप वळसे पाटील यांना दिलेल्या सर्व पदांची माहिती देत एक ट्विटर पोस्ट केली आहे. यात त्यांनी वळसे पाटील यांना सवाल विचारले आहेत. तसंच फक्त सत्तेसाठी अशा प्रकारची बंडखोरी तुमच्याकडून अपेक्षित नव्हती. यासाठी तुम्ही स्वत:ला माफ करु शकणार आहे का? असाही सवाल रोहित पवार यांनी विचारला. (Ncp Mla Rohit Pawar asks questions to Dilip Walse Patil he was close to Sharad Pawar)
काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार म्हणाले, दिलीप वळसे-पाटील साहेब, आदरणीय पवार साहेबांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेला नेता म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो. तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. पण अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली. आपल्या विचारधारेला मूठमाती द्यावी लागली, हे महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय. केवळ सत्तेसाठी अशा प्रकारची बंडखोरी आपल्या सारख्या जेष्ठ नेत्याकडून अपेक्षित नव्हती. असो! प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद आमच्या सह्याद्रीत आहे. सह्याद्रीच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्र उभा असून हा सह्याद्री नव्या जोमाने आणि नव्या ताकदीने उभा राहीलच, परंतु वळसे-पाटील साहेब तुम्ही स्वतःला तुमच्या या कृतीबद्दल माफ करू शकणार का?
NCP : साहेबांनंतर आता दादांनीही दंड थोपटले, दिलीप वळसे-पाटलांसाठी दादा बनले ढाल…
मा. वळसे-पाटील साहेब आदरणीय पवार साहेबांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेला नेता म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो. तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. पण अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली. आपल्या विचारधारेला मूठमाती द्यावी लागली, हे… pic.twitter.com/Kg06T3C5Wp
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 6, 2023
शरद पवार घेणार दिलीप वळसे-पाटलांच्या मतदारसंघात सभा :
दरम्यान, बंडखोरीनंतर शरद पवार यांनी पक्षाच्या पुनर्बांधणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ते महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यातील एक सभा ते वळसे पाटील यांच्या मतदारसंघात घेणार आहेत. अजित पवार यांचं बंड किंवा नाराजी शरद पवार यांना अपेक्षित होते. गेले काही वर्ष पवारांना अजितदादांच्या नाराजीची पूर्ण कल्पना होती. मात्र आपणच बोट धरुन राजकारणात आणलेला मुलगा आपल्याचविरोधात बंडखोरी करेल याची कल्पनाही पवार यांनी कधी केली नसावी. त्यामुळेच अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या वळसे पाटील यांना धडा शिकविण्याचे शरद पवार यांनी मनावर घेतले आहे.
Sanjay Raut : शिंदेंची खुर्ची संकटात? राऊतांनी सांगितलं नेमकं राजकारण!
वळसे पाटलांसाठी अजितदादा सरसावले :
शरद पवार यांनी दौरा जाहीर केल्यानंतर वळसे पाटील यांच्यासाठी अजित पवार ढाल बनले आहेत. शरद पवारांनी दौरा काढला आणि मतदारसंघात सभा घेतल्या तर त्यांच्या दौऱ्याला प्रत्युत्तरात आपणही जाहीर सभा घेऊ, आम्हाला पण भाषण करता येतं असं अजित पवार यांनी म्हंटलं आहे. ते म्हणाले, दिलीप वळसे पाटलांनी काय चूक केली आहे, त्यांनी आपला मतदारसंघ विकासकामांच्या जोरावर बांधला आहे. मलाही थोडे बोलता येते. भाषण करता येते. लोक माझं ऐकतात. उद्या त्यांनी दौरा सुरू केला तर, मलाही तेथे सात दिवसांनी सभा घ्यावी लागेल. मला त्यांना उत्तर द्यावे लागेल. मी गप्प बसलो तर लोक बोलतील की याच्यात काहीतरी खोट आहे. मी खोटा नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत.