Idris Naikwadi Vs Parth Pawar : राजीनामा नाट्यात पार्थ अन् नायकवडी का झालेत आक्रमक?

Idris Naikwadi Vs Parth Pawar 15 दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांच्या OSD ने सांगलीत नायकवडी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली

  • Written By: Published:
Idris Naikwadi Vs Parth Pawar : राजीनामा नाट्यात पार्थ अन् नायकवडी का झालेत आक्रमक?

Sagali MLA Idris Naikwadi Resignation Story : सांगलीचे आक्रमक आमदार इद्रिस नायकवडी यांच्या आमदारकीचा राजीनामा एका युवा नेत्याने मागितल्याने राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या घटनेनंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि वर्चस्वाची लढाई आता थेट चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे. पण, नेमके नायकवडी कुणाला आणि का नकोसे झाले? त्यांचा राजीनामा मागणारा तो युवा नेता कोण? त्याबद्दल जाणून घेऊया…

कोण आहेत इद्रीस नायकवडी?

आता या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले इद्रीस नायकवडी नेमके कोण तर, नायकवाडी हे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर नायकवडी यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. अल्पसंख्याक समाजातील त्यांचे मोठे योगदान पाहता, अजितदादांनी 15 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांना विधान परिषदेवर नियुक्त केले होते.

राजीनाम्याची पडद्यामागची कहाणी

नायकवडी यांच्या राजीनाम्याची कहाणी नेमकी कशी सुरू झाली तर, सुमारे 15 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या OSD ने सांगलीत नायकवडी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या इच्छेनुसार नायकवडी यांना विधानपरिषद सदस्यत्वाचा (MLC) राजीनामा देण्याची सूचना करण्यात आल्याचे सांगण्यात आल्याची चर्चा आहे. सुनेत्रा पवार यांचे ओएसडी किंवा मंत्रालयातील अधिकारी हे नेहमीच कामाच्या निमित्ताने आम्हाला भेटत असतात, त्यामुळे त्या भेटीचा आणि राजीनाम्याचा काहीही संबंध नसल्याचे नायकवडी यांनी म्हटले आहे.

युवा नेत्याबाबत इद्रिस नायकवडी काय म्हणाले?

अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे हाती घेतलेल्या नव्या नेतृत्वाकडून म्हणजेच पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या हातात आहे. त्यात पार्थ पवार यांना पक्षात अनेक जुनी जाणकार नेते मंडळी नकोशी झाली आहेत. त्यानुसार आता नायकवडी यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न होत असल्याच्या कुजबुजीने पक्षात जोर धरलाय. दुसऱ्या एखाद्या नेत्याचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी किंवा राजकीय तडजोडीसाठी नायकवडी यांना ही जागा रिकामी करण्यास सांगण्यात आल्याचीही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

राजीनामा देण्यास थेट नकार

एकीकडे नायकवडी यांच्या राजीनाम्याच्या चर्चा जोर धरत असताना दुसरीकडे मुंबईतील एका बैठकीत नायकवडी यांना दुसरे पद देण्याचे आश्वासन देऊन मनवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, आपण 6 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यावर ठाम असल्याचे सांगत त्यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच “पक्षाकडून मला अद्याप राजीनाम्याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही. प्रत्येक पक्षात असे काही लोक असतात जे अशा प्रकारे जाणीवपूर्वक चर्चा घडवून आणत असतात. ज्या ‘युवा नेत्यानं’ माझा राजीनामा मागितल्याची चर्चा सुरू आहे, तो युवा नेता नेमका कोण आहे? याची मला काहीही कल्पना नसल्याचे नायकवडी यांनी म्हटले आहे.

राजकीय अर्थ आणि भविष्यातील परिणाम

2019 च्या मावळ लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पार्थ पवार काहीसे बॅकफूटवर गेले होते. मात्र, दादांच्या अकाली एक्झिटनंतर पार्थ पवार मैदानात उतरून आक्रमक होतान दिसून येत आहे. दादांनंतर महायुतीच्या सरकारमध्ये आणि पक्षामध्ये स्वतःचे स्थान मजबूत करण्याचा त्यांना प्रयत्न यातून दिसून येत आहे. दुसऱ्या एखाद्या नेत्याचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी किंवा राजकीय तडजोडीसाठी नायकवडी यांना ही जागा रिकामी करण्यास सांगण्यात आल्याचीही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

तर, दुसरीकडे सांगलीच्या राजकारणात महापालिका क्षेत्रापासून ते थेट जिल्हा पातळीपर्यंत इद्रिस नायकवडी यांच्या आक्रमक भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नायकवडी यांनी नेहमीच सांगली-मिरज भागात अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवरून प्रशासनाला धारेवर धरले आहे. स्थानिक पातळीवर तरुणांची मोठी फळी त्यांच्या पाठीशी उभी आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत आणि आगामी निवडणुकांमध्ये स्वतःचे राजकीय वजन वाढवण्यासाठी त्यांनी आक्रमक नेत्याची प्रतिमा तयार केली आहे.

पार्थ पवार आणि इद्रिस नायकवडी हे दोन्ही नेते आपापल्या क्षेत्रात आणि पक्षात ‘युवा नेतृत्वाची पोकळी’ भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. हे दोन्ही युवा नेते आता केवळ ‘फॉलोअर्स’ न राहता ‘लीडर्स’ म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी आक्रमक झाले आहेत. आमदार नायकवडी यांनी जरी अधिकृतपणे राजीनाम्याची शक्यता फेटाळली असली, तरी ‘धूर निघतोय म्हणजेच तिथे नक्कीच काहीतरी शिजत आहे’, अशीच भावना राजकीय विश्लेषक बोलून दाखवत आहेत. नायकवडी यांच्या राजीनाम्याच्या चर्चांमध्ये राष्ट्रवादीत अंतर्गत गोटात सध्या मोठी अस्वस्थता आहे हे मात्र नक्की. त्यामुळे आगामी काळात आता हा वाद नेमकं काय वळण घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us