Neet Exam Paper Leak : ज्यांनी सेट केला, त्यांनीच फोडला…कुलकर्णी अन् मांढरेची ‘मोडस ऑपरेंडी’; CBI कडून पितळ उघडं
नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात सीबीआयच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली असून पी.व्ही कुलकर्णी आणि मनिषा मांढरेली सीबीआय कोठडी सुनावण्यात आलीयं.
Neet Exam Paper Leak : नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली असून ज्यांनी पेपर सेट केला, त्यांनीच पेपर फोडल्याचं आत्तापर्यंतच्या तपासात उघड झालं आहे. या पेपर घोटाळ्यात प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णी (Pralhad Kulkarni) आणि प्राध्यापिका मनिषा मांढरे (Manisha Mandhare) यांची मोडस ऑपरेंडी सीबीआयच्या तपासात उघड झालीयं. त्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे.
भविष्यात राष्ट्रवादी भाजपसोबत गेली तर काय? रोहित पवारांच्या उत्तराने राज्यातील राजकीय चर्चांना उधाण
प्रल्हाद कुलकर्णी आणि मनिषा मांढरे एनटीए पेपर कमिटीचे सदस्य होते. या दोघांचही एक्सपर्ट म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. कुलकर्णी आणि मांढरे दोघेही पुण्यातील घरात कोचिंग क्लासेस घेत होते. याच ठिकाणी मनिषा वाघमारे एजंट म्हणून कार्यरत होती. मनिषा वाघमारे हिने नीटचा पेपर धनंजय लोखंडे याला दिला. लोखंडे याने नाशिकच्या शुभम खैरनारला दिला तर खैरनारने गुरुग्रामच्या यश यादवला दिला. त्यानंतर नीटचा पेपर लिक झाला असल्याचं सीबीआयच्या तपासात उघड झालंय.
नीट पेपर घोटाळ्याची साखळी देशभरात पोहोचलेली असून पुण्यापासून ते थेट राजस्थानपर्यंत या घोटाळ्याची साखळी असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. पेपर घोटाळ्याप्रकरणी आत्तापर्यंत पोलिसांनी दिल्ली, पुणे, जयपूर, नाशिक अहिल्यानगरमधून 9 आरोपींना अटक केली असून त्यापैकी पाच आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आलीयं. तर प्रल्हाद कुलकर्णी आणि मनिषा वाघमारेला दहा दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आलीयं.
दरम्यान, मनिषा वाघमारे हिचे पती संजय वाघमारे यांच पुण्यात डेंटल क्लिनिक असून संजय वाघमारेच्या डेंटल क्लिनिकवरही सीबीआयने छापेमारी केलीयं. या छापेमारीदरम्यान संजय वाघमारे हाती लागले नसून ते फरार असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी संजय वाघमारेचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नीट यूजी परीक्षेसंदर्भात एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर आता पुन्हा ही परीक्षा 21 जून रोजी घेतली जाणार असून, पुढील वर्षापासून नीट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. आता पुढील वर्षापासून, नीट यूजी परीक्षा सीबीटी (CBT) पॅटर्नचा वापर करून ऑनलाइन घेतली जाणार आहे.