15 हजार डॉक्टर घडवल्याचा दावा, पण आता स्वतःच आरोपीच्या पिंजऱ्यात; कोण आहेत मोटेगावकर?
NEET UG शिवराज मोटेगावकर हे आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक आहेत. लातूर, पुण्यातल्या चौकशीनंतर मोटेगावकर यांना CBI ने ताब्यात घेतलं आहे.
NEET UG Paper Leak Who Is Shivraj Motegaonkar : लातूरच्या गल्लीबोळांपासून ते मंत्रालयापर्यंत ज्यांच्या नावाची चर्चा असायची, ज्यांच्या एका शब्दावर हजारो विद्यार्थी आणि पालक डोळे झाकून विश्वास ठेवायचे, तेच ‘एम सर’ म्हणजेच शिवराज मोटेगावकर यांना आज सीबीआयने ताब्यात घेतले आहे. NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असूनन, ज्या ‘लातूर पॅटर्न’ने देशाला हजारो डॉक्टर दिले, त्याच पॅटर्नच्या विश्वासार्हतेवर आणि शिवराज मोटेगावकर यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नेमके मोटेगावकर कोण? त्यांचा क्लासेसचा प्रवास कसा सुरू झाला त्याबद्दल जाणून घेऊया…
NEET Paper Leak : एका ‘खोडकर’ विद्यार्थ्याने असा फोडला कुलकर्णीचा सेट केलेला ‘मास्टर’ प्लॅन!
कोण आहेत शिवराज मोटेगावकर?
शिवराज मोटेगावकर हे मूळचे लातूरचेच असून त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी केमिस्ट्री (रसायनशास्त्र) विषयातून M.Sc. पूर्ण केले असून, ते या विषयात सुवर्णपदक विजेते (Gold Medalist) आहेत.त्यांनी केवळ अध्यापनच केले नाही, तर SET/NET-JRF, GATE, DRDO, BARC आणि TIFR यांसारख्या अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केल्या आहेत.उच्च शिक्षणांनंतर मोठ्या पगाराच्या नोकरीमागे न धावता त्यांनी लातूरमध्ये राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला.
एम सर म्हणून विद्यार्थ्यांमध्ये परीचित
शिवराज मोटेगावकर हे महाराष्ट्राच्या कोचिंग विश्वात ‘एम सर’ म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना खाजगी शिकवणी देऊन केली, त्यासाठी ते अनेकदा सायकलवरून शहरभर प्रवास केला. 1999 साली त्यांनी एका भाड्याच्या खोलीत फक्त 10 विद्यार्थ्यांसह कोचिंग क्लासेस सुरू केले. माजी विद्यार्थ्यांच्या मते, सुरुवातीच्या काळात ते स्वतः हाताने नोट्स तयार करून रसायनशास्त्र शिकवत असत आणि इयत्ता 11वी, 12वी तसेच प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लहान तुकड्या सांभाळत असत.
RCC क्लासेसचा उदय आणि विस्तार
2023 मध्ये मोटेगावकर सरांनी ‘रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस’ (RCC) ची मुहूर्तमेढ एका लहान खोलीत घरगुती शिकवणीतून रोवली. सुरुवातीला ते केवळ केमिस्ट्री विषयासाठी ओळखले जात. मात्र, 2014 च्या सुमारास त्यांच्या दोन विद्यार्थ्यांनी MHT-CET मध्ये राज्यात यश मिळवल्यानंतर RCC क्लासेसचे नाव सर्वत्र पसरले. हळूहळू त्यांनी मेडिकल आणि इंजिनिअरिंग प्रवेशासाठी लागणाऱ्या सर्व विषयांचे कोचिंग देण्यास सुरुवात केली. लातूर पॅटर्नमध्ये त्यांनी स्वतःचा ‘आरसीसी पॅटर्न’ विकसित केला. आज मोटेगावकर यांच्या लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या शहरांमध्ये शाखा आहेत.
NEET UG परीक्षेत पेन-पेपर युगाचा अंत; पुढील वर्षापासून CBT मोड; नेमकं काय बदलणार?
मॉक टेस्ट ठरली ‘टर्निंग पॉईंट’
यंदाच्या NEET परीक्षेबाबत सीबीआयला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, लातूरमधील काही खासगी क्लासेसच्या ‘मॉक टेस्ट’ (सराव परीक्षा) मधील तब्बल 42 प्रश्न हे प्रत्यक्ष नीट परीक्षेतील प्रश्नांशी मिळतेजुळते होते. सीबीआयने मोटेगावकर यांच्या निवासस्थानी आणि शिवनगरमधील कार्यालयावर छापे टाकून तब्बल 8 तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात केवळ मोटेगावकरच नव्हे, तर पेपर सेटिंग कमिटीतील निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी आणि पुण्याच्या मॉडर्न महाविद्यालयाच्या मनीषा मांढरे यांनाही अटक करण्यात आली आहे.
विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण
गेल्या दोन दशकांत 15 हजारांपेक्षा जास्त डॉक्टर घडवल्याचा दावा करणाऱ्या मोटेगावकर यांच्या संस्थेवर अशा प्रकारचे आरोप झाल्यामुळे सध्या लातूरसह राज्यभर खळबळ उडाली आहे. ज्या सरांनी ‘गरिबांना संधी मिळावी’ म्हणून स्कॉलरशिप सुरू केली, तेच या गैरप्रकारात कसे अडकले, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्रभर गाजणार लातूर पॅटर्न नेमका काय?
एकेकाळी बोर्डाच्या परीक्षेत (HSC/SSC) दबदबा निर्माण करणाऱ्या लातूर पॅटर्नने नंतर NEET आणि JEE सारख्या राष्ट्रीय परीक्षांकडे मोर्चा वळवला. मात्र, मोटेगावकर यांच्यावरील कारवाईमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रभर गाजलेल्या लातूर पॅटर्नची चर्चा सुरू झाली आहे. हा पॅटर्न इतर शिक्षण पद्धतीपेक्षा वेगळा का ठरला तर, यात अभ्यासाचे काटेकोर नियोजन केले जात. सत्र सुरू होण्यापूर्वीच संपूर्ण वर्षाचे नियोजन केले जाते. कोणता धडा कधी संपणार आणि त्यावर परीक्षा कधी होणार, हे आधीच ठरलेले असते. लातूर पॅटर्नचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वारंवार घेतल्या जाणाऱ्या परीक्षा. दर आठवड्याला किंवा 15 दिवसाला प्रकरणांनुसार सराव परीक्षा घेतल्या जातात, ज्यामुळे विद्यार्थ्यांची भीती निघून जाते. केवळ परीक्षा घेऊन थांबले जात नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्याला कुठे कमी गुण मिळाले, याचे विश्लेषण शिक्षकांद्वारे केले जाते. पण आता, मोटेगावकर यांच्यासारख्या बड्या संचालकांवर पेपरफुटीच्या आरोपांमुळे या सुवर्ण इतिहास असलेल्या ‘पॅटर्न’च्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.