चिंता वाढणार! नऊ जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस; सांगलीत सर्वाधिक 44 टक्के तूट

चिंता वाढणार! नऊ जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस; सांगलीत सर्वाधिक 44 टक्के तूट

पुणे : एकंदर सर्वसाधारण सरासरीची नोंद करत मोसमी पावसाचा (Monsoon Rain) चार महिन्यांचा हंगाम समाप्त झाल्याचं हवामान खात्यानं (IMD) सांगितलं. राज्यात 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत सरासरी 994.5 मिमीच्या तुलनेत 965.7 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा पाऊस सरासरीपेक्षा केवळ तीन टक्के कमी झाला. तरीही राज्यातील नऊ जिल्ह्यांतील परिस्थिती चिंताजनक असून सांगलीत सरासरीच्या केवळ 44 टक्केच पाऊस झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सांगलीत सरासरी 486.1 मिमी पाऊस पडतो, यंदा केवळ 272.7 मिमी पाऊस झाला आहे. सांगलीच्या पश्चिम शिराळा, वाळवा तालुक्यात चांगला पाऊस झाला असला तरी कमी पावसामुळे परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा 37 टक्के कमी तर सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा 30 टक्के कमी पाऊस झाला आहे.

कोकण विभागात सरासरी 2870.8 मिमी पाऊस पडतो, या वर्षी 11 टक्के जास्त म्हणजेच 3177.6 मिमी पाऊस पडला आहे. मात्र रत्नागिरीत 2 टक्के कमी पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रात 12 टक्के कमी तर मराठवाड्यात 11 टक्के कमी पाऊस झाला आहे. विदर्भात 2 टक्के पावसाची तूट आहे.

मराठवाड्यातील परिस्थिती देखील चिंताजनक
मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने चिंता वाढण्याची शक्यता आहे. कारण अजूनही अनेक भागात पुरेसा पाऊस झालेला नाही. शिवाय, मराठवाड्यातील 76 पैकी 29 तालुक्यांमध्ये सरासरीच्या निम्म्याहून कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे आगामी काळात या तालुक्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

काल रत्नागिरीत पाऊस
अरबी समुद्रातील कमी दाबामुळे रविवारी रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस झाला. रत्नागिरी, खेड, दापोली, राजापूर आणि संगमेश्वर या पाच तालुक्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले.

परतीचा प्रवास सुरू
मान्सूनने देशभरात परतीचा प्रवास सुरू केला आहे. दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमधून मान्सून परतला आहे. याशिवाय मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यांतील विविध भागांतून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होत आहे. 4 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube