मंत्रिमंडळ बैठकीसाठी खास मेन्यू; शिपी आमटी, पुरणपोळी अन् शेंगोळ्यांचा बेत

Ahilyanagar News : महायुतीच्या मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी जामखेड तालुक्यातील चौंडी (Maharashtra Cabinet Meeting) गावात होत आहे. आधी ही बैठक 28 एप्रिलला होणार होती. परंतु, काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली. खरंतर बैठकीसाठीच्या दीडशे कोटींच्या खर्चाच्या मुद्द्यावर सरकार बॅकफूटवर गेले होते. बैठकीच्या खर्चाच्या निविदेत प्रिंटींग मिस्टेक झाल्याचे कारण देत तेव्हा वेळ मारून नेण्यात आली होती. आता हीच बैठक एका खास कारणाने चर्चेत आली आहे. या बैठकीसाठी जिल्हा प्रशासनाने खास मेन्यू ठरवला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने प्रथमच महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक चौंडी येथे होत आहे. बैठकीला दीड ते दोन हजार लोक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. जेवणासाठी कर्जतची प्रसिद्ध शिपी आमटी, पुरणपोळी, शेंगोळे, मासवडी, हुरडा थालीपीठ असा झणझणीत बेत आहे. आणि हो, सर्वात महत्वाचं म्हणजे या जेवणाचा सगळा खर्च विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) उचलणार आहेत.
मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, 36 मंत्री, सहा राज्यमंत्री, प्रशासकीय अधिकारी, पोलीस बंदोबस्त, राज्यातून येणारे आमदार, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते असे दोन ते तीन हजार व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. या सर्व मंडळींना भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. जेवणात काय खाद्यपदार्थ असतील हे जिल्हा प्रशासनाने निश्चित केला आहे. त्यानुसार जेवणाची तयारी करण्यात येणार आहे.
Ram Shinde : विखेंचे आदेश, प्रशासनाची डोळेझाक, आता राम शिंदेच मैदानात; आजपासून करणार उपोषण
या बैठकीच्या तयारीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर आहे. प्रशासनाची तयारी पूर्ण होत आली आहे. या बैठकीसाठी दोन ते तीन हजार लोक येण्याची शक्यता आहे. या लोकांच्या जेवणाचा सगळा खर्च राम शिंदे करणार आहेत. जेवणासाठीचा मेन्यू जिल्हा प्रशासनाने निश्चित केला आहे. आता जेवणात काय असणार असा प्रश्न पडला असेल. तर मंत्री अन् आमदारांच्या जेवणात स्थानिक खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे.
कर्जतची शिपी आमटी राज्यात प्रसिद्ध आहे. जेवणासाठी शिपी आमटी, पुलाव, पुरणपोळी, कुरडई, थालीपीठ, खवा पोळी, मासवडी, आमटी भाकरी, कोथिंबीर वडी, हुरडा थालीपीठ, शेंगोळे, वांग्याचे भरीत, डाळबट्टी, मटकी, मसाला वांगे, स्पेशल शिंगोरी आमटी, भात, बाजरीची भाकरी, दही धपाटे, आमरस चपाती, वांगी भरीत भाकरी, हुलग्याचे शेंगोळे, शेवगा भाजी, शिंगोरी आमटी-ठेचा-भाकरी,मांडे, बीट थालीपीठ असा खास महाराष्ट्रीयन बेत आहे.