Ahilyanagar : नीटच्या परिक्षेत कमी गुण मिळाले…विद्यार्थीनीने गळफास घेत जीवन संपवलं
अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील अंकिता सांगळे या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली.
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील अंकिता सांगळे (Ankita Sangle) या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. नीट परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यानेच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तिच्या घरच्यांनी सांगितलं आहे. अंकिताने आत्महत्या करण्यापूर्वी कुटुंबियांसाठी सुसाईड नोट लिहिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.
NEET नंतर आता MPSC औषध निरीक्षक भरतीही वादात; आमदार रोहित पवारांनी A To Z सांगितलं…
अंकिताला नीट परीक्षेत 166 गुण मिळाले आहे. अपेक्षित गुण मिळाले नाहीत म्हणून मानसिक तणावात तिने काल सायंकाळी साडेचार वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दावा कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. अंकिता हिला अभ्यासासाठी स्वतंत्र खोली देण्यात आलेली होती आणि ती त्यामध्येच बसून अभ्यास करत होती. बराच वेळ झाला तिचा काही आवाज किंवा हालचाल दिसली नाही म्हणून तिच्या घरच्यांनी खोलीचा दरवाजा उघडून पाहिलं तर अंकिताने गळफास घेतल्याचे समोर आले. त्यानंतर पोलीस प्रशासनाला माहिती कळवण्यात आली. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये अण्णा सांगळे यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला. नीट पेपर लिक प्रकरण देशभरात चांगलंच गाजलेलं असतानाच एका कमी गुण मिळाले म्हणून विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची बातमी समोर आलीयं.
अंकिताने सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं?
तुम्ही मला एवढा जीव लावला, पण मी तुमची एकपण इच्छा पूर्ण करू शकले नाही…मम्मी तू तर प्रत्येक संकटात मैत्रीण म्हणून साथ दिली… दादा तू पण मला खूप साथ दिली… मम्मी, पापा पेक्षा तू जास्त जीव लावला…माझ्या आत्महत्येला तुम्ही जबाबदार नाही आहात… तुम्ही मला जे सुख दिलंय ते मी कधीच विसरू शकत नाही… दादा तू मम्मी पप्पांना चांगलं सांभाळ, त्यांना कोणत्या गोष्टीची कमी पडू देऊ नको…तू ही आनंदी रहा..तुम्ही आनंदी राहा… माझं काही चुकलं असेल तर माफ करा… तुम्हाला मी कोणतच सुख देऊ शकले नाही…आधीच मी NEET चा अभ्यास करत होते, तेव्हा पण सगळं काही त्याग केला तुम्ही… आणि मी काय केलं? तुमची इच्छा पूर्ण नाही करू शकले…आता कसला त्रास करून घेऊ नका…आनंदी राहा…तुमची दिदी, अंकिता, असं सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.