मनोज जरांगेंच्या मोर्चामुळे अहिल्यानगर शहरातील वाहतुकीत बदल; जाणून घ्या, पर्यायी मार्ग..

Ahilyanagar News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे (Maratha Reservation) या मागण्यासाठी आता पुन्हा एकदा मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आंदोलनचे हत्यार उपसले आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. यामुळे नगरमधून त्यांचा ताफा जाणार असल्याने या ठिकाणी वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. यामुळे वाहनधारकांसाठी कोणते पर्यायी मार्ग असणार आहे याबाबत पोलीस प्रशासनाने (Ahilyanagar News) निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.
मनोज जरांगे पाटील मोर्चासह अंतरवली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथून आझाद मैदान मुंबईला जाणार आहेत. जरांगे यांचा ताफा बुधवारी 27 ऑगस्ट रोजी नगर जिल्हा हद्दीतील घोटण, शेवगाव, मिरी, माका, पांढरीपूल, अहिल्यानगर बायपास मार्गे, नेप्ती चौक, आळेफाटा मार्गे शिवनेरी किल्ला (ता. जुन्नर) येथे मुक्कामी जाणार आहे. या मोर्चादरम्यान वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव सुरू होत असल्याने संबंधित मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ आहे.
त्यामुळे या काळात अहिल्यानगर जिल्हा हद्दीतील घोटण, शेवगाव, मिरी, माका, पांढरीपूल, अहिल्यानगर बायपास मार्गे, नेप्ती चौक या मार्गावरील सर्व प्रकारची अवजड व मालवाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
Video : जरांगेंच्या मनधरणीसाठी भाजपने दोन डाव टाकले; एकाची पोस्ट तर, दुसरा थेट भेटीला
पर्यायी मार्ग काय असणार ? जाणून घ्या
छत्रपती संभाजीनगरकडून नेवासे फाटा, पांढरीपूल, अहिल्यानगर, शेंडी बायपास मार्गे इच्छित स्थळी जाणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड व मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना नेवासे फाटा, श्रीरामपूर, राहुरी फॅक्टरी, विळद बायपास मार्गाने जावे लागणार आहे. अहिल्यानगरकडून अहिल्यानगर एमआयडीसी शेंडी बायपास, पांढरीपूल मार्गे इच्छित स्थळी जाणाऱ्या वाहनांना विळद बायपास, राहुरी फॅक्टरी, श्रीरामपूर, नेवासे फाटा मार्गे इच्छित स्थळी जावे लागणार आहे.
शेवगावकडून मिरी ते माका मार्गे पांढरीपुलाकडे येणारी सर्व प्रकारची वाहने शेवगाव, कुकाणा, नेवासे फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. तिसगावमार्गे इच्छित स्थळी जावे लागणार आहे. पांढरीपुलाकडून मिरी ते माकामार्गे शेवगावकडे जाणाऱ्या वाहनांना जेऊर, कोल्हार घाट, चिचोंडी या मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. दरम्यान, शासकीय वाहने मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चातील वाहने, रुग्णवाहिका, अग्निशामक दलाची वाहने व अत्यावश्यक कारणास्तव स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांना हा आदेश लागू राहणार नाही याबाबतचा आदेश पोलीस अधिक्षकांनी दिले आहे.