खासदार लंकेंकडून रस्ते अन् पुलांची दुरूस्ती, हाती खोरे घेत स्वत: केली आरोग्य केंद्राची स्वच्छता! 

Nilesh Lanke
अहिल्यानगर – आपत्तीग्रस्त खडकी,  अकोळनेर, वाळकी, अस्तगांव, सारोळा कसार, भोरवाडी, जाधववाडी, सोनेवाडी या गावांमध्ये रविवारी निलेश लंके प्रतिष्ठान (Nilesh Lanke Foundation) तसेच आपला मावळा संघटनेच्या वतीने विविध रस्ते,  पूल तयार करण्यात आले.  विशेष म्हणजे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke)यांनी स्वतः हातामध्ये झाडू, खोरे घेऊन स्वच्छता केली. मात्र, आठवडा होऊनही प्रशासनाकडून केवळ पाहणी करण्यात आली, कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.
गेल्या आठवडयात मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे या गावांतील रस्ते,  पूल वाहून गेले. जनावरे दगावली. या आपत्तीनंतर खा. लंके यांनी या भागाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी संसार उघड्यावर पडलेल्या नागरिकांना किराणा तसेच जनावरांचा चारा उपलब्ध करून देत नागरिकांना दिलासा दिला.
विविध गावांमध्ये मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याने खा. लंके यांनी संपूर्ण नुकसानीचा आढावा घेऊन आपला मावळा संघटनेच्या माध्यमातून मदत मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. अनेक ठिकाणी रस्ते व पूल वाहून गेले होते, ते दुरूस्त करण्यात आले.
रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सर्व गावांमध्ये एकाच वेळी या कामांना सुरूवात करण्यात आली. खा. लंके यांनी यावेळी विविध गावांमध्ये जात या मदतकार्यात सहभाग नोंदविला.
आरोग्य केंद्राची स्वच्छता
वाळकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पूलाचे पाणी शिरल्यामुळे केंद्रात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. चार फुटापर्यंत पाणी साचलेल्या या केंद्रास खा. लंके यांनी  भेट दिल्यानंतर त्यांनी स्वतः हाती खोरे घेत संपूर्ण केंद्रातील गाळ उचलला. गाळ उचलण्यात आल्यानंतर संपूर्ण इमारत धुवून काढण्यात आली. पाणी शिरल्यामुळे आरोग्य केंद्रातील उपचार बंद होते. मात्र, आरोग्य केंद्राची स्वच्छता केल्यानंतर निलेश लंके प्रतिष्ठानची रूग्णवाहिका घेऊन येणाऱ्या रूग्णांवर उपचारही सुरू करण्यात आले.
https://www.youtube.com/watch?v=AdVCTNjHrE0

follow us
  • fb
  • instagram
  • youtube