खाकीची नोकरी अन् आमदाराची चाकरी; पोलिस कर्मचाऱ्याला थेट घरी पाठवलं…
Ahmednagar News : खाकी वर्दीची नोकरी अन् आमदाराची चाकरी करणं एका पोलिस कर्मचाऱ्याला चांगलच भोवलं आहे. या प्रकरणी पोलिस अधीक्षक राकेश ओला (Rakesh Ola) यांनी संबंंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करीत थेट घरी पाठवलं आहे. भाऊसाहेब शिंदे (Bhausaheb Shinde) असं या पोलिस कर्मचाऱ्याचं नाव असून आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाची जाहीरात करत असल्याचा ठपका या कर्मचाऱ्यावर ठेवण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात ‘मशाल’ पेटण्यापूर्वीच विझणार; पाटील, कदम अन् पवारांकडून ‘ठाकरेंचा’ करेक्ट कार्यक्रम
रजेवर असताना पोलिस कर्मचाऱ्याने आमदार निलेश लंके यांनी आयोजित केलेल्या महानाट्याच्या कार्यक्रमाची माहिती देत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी या कर्मचाऱ्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करत कर्मचाऱ्याचे खातेनिहाय चौकशीचे आदेश काढले. भाऊसाहेब शिंदे असे निलंबित कर्मचाऱ्याचे नाव आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी भाऊसाहेब ज्ञानदेव शिंदे हे 20 फेब्रुवारीपासून रजेवर होते. दरम्यानच्या काळात त्यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिवपुत्र संभाजी, या कार्यक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना देत असताना या कार्यक्रमासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले.
तसेच भाऊसाहेब शिंदे हे शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना महानाट्याची माहिती सांगत होते. याबाबतचा व्हिडिओ काही जणांनी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना दिला. तसेच अशा प्रकारे राजकीय व्यक्तीला मदत मिळवून देत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, या घटनेमुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मालिन होऊ लागल्याने पोलीस अधीक्षकांनी देखील तातडीने याबाबत ठोस पाऊल उचलले. पोलिस अधीक्षकांनी तत्काळ दखल घेत या प्रकरणी प्राथमिक चौकशी करत पोलिस कर्मचारी भाऊसाहेब शिंदे यांचे तडकाफडकी निलंबन केले. तसेच शिंदे यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश काढले. या घटनेने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षकांनी काढला आदेश…
आमदार निलेश लंके यांनी आयोजित केलेल्या ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याची माहिती शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना देत असल्याचा एका व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हक्क रजेवर असताना शिंदे यांनी आमदार लंके त्यांच्या वाढदिवसनिमित्ताने आयोजित केलेल्या महानाट्याची माहिती विद्यार्थ्यांना देणे नगर पोलिस दलास अशोभनीय आणि बेशिस्तीचे असल्याचं सांगत भाऊसाहेब शिंदे यांच्या निलंबनाचा आदेश काढण्यात आल्याचं पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितलं आहे.