Ahmednagar : आता संप हाच पर्याय! शिंगणापूर देवस्थानचे कामगार उद्यापासून संपावर
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थान मंदिर प्रशासन सध्या (Ahmednagar News) चर्चेत आहे. घोटाळ्याचे आरोप झालेल्या या मंदिर प्रशासनाची चौकशीचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानंतर आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. देवस्थानचे कामगार आपल्या कायदेशीर हक्क व मागण्यांसाठी उद्यापासून (25 डिसेंबर) संपावर जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने मध्यस्थी करावी यासाठी ते जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी मध्यस्थी विनंती महामुक्काम केला जाणार आहे. कामगारांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांनाही निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की श्री शनैश्वर देवस्थान कामगार युनियन (सी.आय.टी.यू संलग्न) संघटनेचे सर्व सभासद २५ वर्षांपासून कामगार म्हणून कार्यरत आहेत. यामधे सर्व कामगार हे पर्मनंट आहेत. देवस्थानचे कार्यकारी अधिकारी व विश्वस्थ कामगारांच्या कायदेशीर हक्क व मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहेत. याआधीचा करारनामा 2003 मध्ये झाला होता. यामधे समेट अधिकारी म्हणून तत्कालीन सहाय्यक कामगार आयुक्त फुफाटे यांनी सकारात्मक भूमिका बजावली होती.
Ahmednagar News : शनिशिंगणापूर देवस्थानात कोट्यवधींचा भ्रष्टाचार? कारवाईसाठी आमरण उपोषण सुरु
देवस्थानाच्या कामगारांचे हक्क अधिकार डावलणे हे कोणत्याच अधिकारात येत नाही. कामगारांमधे अनेक महिला कामगार आहेत. कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. नुकसान भरपाई दिली जात नाही. कोरोना काळातील 18 महिन्यांचा राहिलेला अर्धा पगार दिला जात नाही. अशा काही महत्वाच्या मागण्या या कामगारांच्या आहेत. 2003 साली केलेल्या करारनाम्याची अंमलबजावणी अद्यापही केलेली नाही. देवस्थानकडून कायद्याला फाटा दिला जात आहे. हे गंभीर आहे. त्यामुळे युनियनच्यावतीने 11 डिसेंबर रोजी बेमुदत संपाचे पत्र दिले तरीही देवस्थानचे जबाबदार व्यक्ती व विश्वस्त, अधिकारी कामगारांसोबत या मुद्द्यांवर बोलत नाहीत, मागण्या मान्य करत नाहीत.
संप काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सर्वजण संपकाळात २५ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी निवासस्थानी येऊन मध्यस्थीची विनंती करणार आहेत. जिल्हाधिकारी यांनी या गंभीर प्रश्नातून मार्ग काढण्याची कामगारांनी विनंती केली आहे. कामगारांच्या आंदोलनाच्या पवित्र्याने प्रशासनातही अस्वस्थता वाढली आहे. आता यानंतर काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Ahmednagar News : शनिशिंगणापूर देवस्थानात कोट्यवधींचा भ्रष्टाचार? कारवाईसाठी आमरण उपोषण सुरु