शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! औषधी अन् सुगंधी वनस्पतींची लागवड करा बिनधास्त; ‘या’ ठिकाणी करा अर्ज

Agriculture News : शेतकऱ्यांसाठी खास बातमी आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना कदाचित माहिती नसेल केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांनुसार एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत औषधी व सुगंधी वनस्पती लागवड हा घटक नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. यासाठी सरकारकडून अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सुगंधी आणि औषधी वनस्पती लागवड करण्याची इच्छा आहे आवड आहे त्यांच्यासाठी ही बातमी फायद्याची आहे. खरंतर औषधी व सुगंधी वनस्पती लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी mahadbtmahait.gov.in या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे.
केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत औषधी व सुगंधी वनस्पती लागवड हा घटक नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. सन २०२५-२६ साठी ४ कोटी ४० लाख रुपयांच्या वार्षिक आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे.
पावसाळा येतोय, मुख्यालय सोडू नका! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश अन् अधिकारी कर्मचाऱ्यांना कामांची यादी
औषधी अन् सुगंधी वनस्पती लागवड करा..
मुलेठी, शतावरी, कालीहारी, कळलावी, सफेद मुसळी, गुग्गुळ, मंजिष्ठा, कुटकी, अतिस, जटामासी, अश्वगंधा, ब्राह्मी, तुलसी, विदारीकंद, पिंपळी, चिराटा व पुष्करमूळ या औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी प्रती हेक्टर 1 लाख 50 हजार रुपयांचा मापदंड आहे. यात सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 40 टक्के व अधिसूचित क्षेत्रामध्ये 50 टक्के अर्थसहाय्य देय आहे. लागवड साहित्य व आयएनएम, आयपीएमचा खर्च 2 हेक्टरच्या मर्यादेत 2 आठवड्यांमध्ये देय आहे.
गुलाब, रोझमेरी, निशिगंध, जिरेनियम, कॅमोमाईल, चंदन, दवणा, जाई व लॅव्हेंडर या महत्त्वाच्या सुगंधी वनस्पतींच्या लागवडीसाठी प्रती हेक्टर 1 लाख 25 हजार रुपयांचा मापदंड आहे. सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 40 टक्के व अधिसूचित क्षेत्रामध्ये 50 टक्के अर्थसहाय्य देय आहे. लागवड साहित्य व आयएनएम, आयपीएमचा खर्च 2 हेक्टरच्या मर्यादेत 2 आठवड्यांमध्ये देय आहे.
पाण्याचा थेंब किती दूषित? जिल्ह्यातील दीड हजार गावांत पाणी तपासणी; FTK देणार झटपट रिपोर्ट
इतर सुगंधी वनस्पतींमध्ये पामरोसा, गवती चहा, तुळस, व्हेटीव्हर, जावा, सिट्रोनेला, गोड तुळशीपत्र यांच्यासाठी 50 हजार रुपयांचा मापदंड आहे. यात सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 40 टक्के व अधिसूचित क्षेत्रामध्ये 50 टक्के अर्थसहाय्य देय आहे. लागवड साहित्य व आयएनएम, आयपीएमचा खर्च 2 हेक्टरच्या मर्यादेत 2 आठवड्यांमध्ये देय आहे अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली.