नितेश राणेंवर गुन्हा दाखल करून अटक करा…; नगरमध्ये मुस्लिम समाज आक्रमक
अहमदनगर – महंत रामगिरी महाराज (Mahant Ramgiri Maharaj) यांनी गेल्या काही दिवसापूर्वी मुस्लिम समाजाचे पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुस्लिम समाजाच्यावतीने अहमदनगरमध्ये (Ahmednagar)आंदोलन करण्यात आले होते. राज्यामध्ये ठिकठिकाणी रामगिरी महाराजांना विरोध झाल्यानंतर रविवारी रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ हिंदू समाजाच्यावतीने आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यानंतर आता मुस्लिम समाजाने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.
नगर शहर परिसरातून काढण्यात आलेल्या मोर्चानंतर आमदार नितेश राणे यांनी पुन्हा मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले व जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला. संतप्त मुस्लिम समाजाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. आमदार नितेश राणे सातत्याने समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करतात. कालही त्यांनी धार्मिक भावना तसेच दोन समाजातील निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या निवेदनाप्रसंगी शहरातील मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
फडणवीस शेवटच्या पेशव्याचे उत्तराधिकारी, ते शिवरायांच्या इतिहासाचे शत्रू…; संजय राऊतांची जहरी टीका
राणे काय म्हणाले?
अहमदनगरमध्ये काल रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला आमदार नितेश राणे यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना राणे म्हणाले की, छत्रपती शिवरायांकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर शुक्रवारी कोणी वर येणार नाही, आमचे अब्बा तुमच्या अब्बांच्या पाकिस्तानात नाही तर हिंदुस्तानात बोलले आहेत. त्यामुळे एवढ्या संख्येने बाहेर येऊ की किड्या-मकोड्यासारखं मारु, ज्या रॅलीत नितेश राणे चालतो, तिकडं कोणी येत नाही, हा हिंदुंचा देश येथे फक्त भगवंतांचे चालेल बाकी कोणाचे नाही, कोणीही मस्ती केली तर चून-चून के मारेंगे, या शब्दांत नितेश राणे यांनी धमकावलंय. यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून हे विधान राणे यांना भोवण्याची शक्यता आहे.
वारिस पठाण यांनी केली अटकेची मागणी…
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्यात आले. अहमदनगरमध्येही मोर्चा काढण्यात आला. यावेळी नितेश राणेही सहभागी झाले होते. नितीश राणेंच्या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा राहिली. यानंतर एमआयएम नेते वारिस पठाण यांनी व्हिडिओ शेअर करत नितेश राणे धार्मिक हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली.