नाथाभाऊ शरद पवारांची साथ सोडणार? एकाच वाक्यात खडसेंनी दिला फुलस्टॉप!

Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला गळती लागली आहे. जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील या नेत्यांसह त्यांच्या समर्थकांनी अजित पवार गटात प्रवेश केला. जळगाव जिल्ह्यातील राजकारणात शरद पवार गटाला हा मोठा धक्का होता. यानंतर लगेचच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याबाबतीत चर्चा सुरू झाल्या आहेत. नाथाभाऊ शरद पवारांची साथ सोडणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र, या प्रश्नाचं उत्तर स्वतः एकनाथ खडसेंनीच दिलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या पक्ष बदलाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आम्ही शरद पवार साहेबांसोबतच आहोत असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.
खडसे पुढे म्हणाले, अजितदादांच्या गटात जळगावातील काही नेते मंडळी गेली. ज्यांना जायचं होतं ते गेले. यानंतर आता आणखी कुणी अजित पवार गटात जातील असे वाटत नाही. आम्ही शरद पवार साहेबांसोबत आहोत. सध्याची परिस्थिती पाहता आज तरी जिल्ह्यातील कोणताही गट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाईल याची शक्यता नाही. अजित पवारांचा गट राष्ट्रवादीतून बाजूला झाला. त्यावेळपासून ज्यांना त्यांच्या गटात जायचं होतं ते सर्व आमदार आता गेले आहेत. त्यावेळी मलाही अजित पवारांच्या गटात येण्याचा निरोप होता. परंतु, मी शरद पवार साहेबांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. आताही त्यांच्या सोबतच राहणार आहोत.
निष्ठावंतांना मानाचं पान! नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी भालसिंग तर उत्तर जिल्हाध्यक्षपदी नितीन दिनकर
शरद पवार जो निर्णय घेतील त्यानुसारच माझा निर्णय राहील. त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी बाकीच्या गोष्टींकडे लक्ष न देता पक्ष विस्ताराच्या कामावर अधिक लक्ष केंद्रीत करावे असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. एकनाथ खडसे यांनी ही भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्यांच्या अजित पवार गटात जाण्याच्या चर्चा आता बंद होतील असे सांगितले जात आहे. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता शरद पवार गटाला जळगावात आणखी धक्के बसणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
..तरीही देवकरांनी पक्ष बदलला
दरम्यान, गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चार मोठे प्रवेश झाले. माजी मंत्री सतीश पाटील, माजी मंत्री जळगाव ग्रामीणचे गुलाबराव देवकर, चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील (चोपडा), विधानपरिषदेचे माजी सदस्य दिलीप सोनवणे हे प्रवेश झाले होते. हे सर्वजण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत होते. जळगावमधील घरकुल घोटाळ्यात गुलाबराव देवकरांचा शिक्षा झालेली होती. अनेक भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना शरद पवारांनी देवकरांना विधानसभेला तिकीट दिले होते. त्यानंतही देवकरांनी शरद पवार यांची साथ सोडली आहे.
देवकरांना अजितदादांनी बरोबर घेतल्याने महायुतीकडे टीका होऊ लागली. पाणीपुरवठा मंत्री व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व गुलाबराव देवकर हे कट्टर राजकीय विरोधक आहे. या प्रवेशानंतर गुलाबराव पाटील यांनी देवकर यांच्यासह थेट अजित पवारांवर हल्लाबोल केलाय. आमची इच्छा नसतानाही अजित पवार यांनी त्या सर्वांना पक्षात घेतले आहेत. अजित पवार यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.
जगतापांना भिडणारे शत्रुघ्न काटे पिंपरी-चिंचवडचे नवे शहराध्यक्ष; मनपा निवडणुकीत चमत्कार करणार?