जगतापांना भिडणारे शत्रुघ्न काटे पिंपरी-चिंचवडचे नवे शहराध्यक्ष; मनपा निवडणुकीत चमत्कार करणार?

जगतापांना भिडणारे शत्रुघ्न काटे पिंपरी-चिंचवडचे नवे शहराध्यक्ष; मनपा निवडणुकीत चमत्कार करणार?

Pune News : प्रदेश भाजपने आज (ता.13 मे) राज्यातील 58 शहरांतील जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. यामध्ये उद्योगनगरी अर्थात पिंपरी चिंचवडचे भाजपचे नवे शहराध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष म्हणून विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप हे काम पाहत होते. जगताप यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नव्या शहराध्यक्षाची प्रतिक्षा शहराला होती.

नवीन शहराध्यक्ष कोण असणार याचा सस्पेन्स गेल्या काही दिवसांपासून शहरात होता मात्र तो आज संपला आहे. पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदासाठी नामदेव ढाके, सदाशिव खाडे, राजू दुर्गे आदी मंडळी इच्छुक होते मात्र काटे यांनी बाजी मारली आहे. काटे यांनी तीन वेळा नगरसेवक म्हणून काम केलं आहे. शिवाय दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून काटे यांची ओळख आहे. मात्र लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून काटे इच्छुक होते. मात्र तसे झाले नाही.

सुप्रियाताई साहेबांची इच्छा पूर्ण करा, अजितदादांसोबत चला.. पदाधिकाऱ्यांची आर्त हाक

चिंचवड विधानसभा मतदारसंघात जगताप कुटुंबाच्या बाहेरील उमेदवार द्यावा अशी थेट आणि आक्रमक भूमिका घेत 13 नगरसेवकांना सोबत घेत काटे यांनी बंड केलं होतं. मात्र तत्कालीन भाजप श्रेष्ठींनी त्यांची समजूत काढली आणि काटेंना शहर कार्यकारणीत कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते. स्थानिक राजकीय जाणकारांच्या मते काटे यांना तेव्हाच पक्ष नेतृत्वाने शहराध्यक्ष पदाची बोलणी केली होती असे बोलले जात आहे. मात्र यात किती तथ्य हे काटेच सांगू शकतील.

दरम्यान, काटे यांच्या नियुक्ती करण्यामागचं कारण म्हणजे ते भूमिपुत्र आहेत. शिवाय आक्रमक चेहरा असल्याने अजितदादांच्या पिंपरी चिंचवड शहरात भाजपचा दबदबा टिकून ठेवण्यासाठी काटेंसारखा आक्रमक चेहरा असणे आवश्यक होतं हे हेरून भाजप नेतृत्वाने काटे यांच्या गळ्यात शहराध्यक्ष पदाची माळ घातल्याचे बोलले जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीत शहराध्यक्ष म्हणून काटे कसा परफॉर्मन्स करतात आणि महापालिकेत किती नगरसेवक निवडून देतात यावर काटे यांची पुढची राजकीय कारकीर्द अवलंबून असणार हे मात्र नक्की.

पुणे भाजपचे पुन्हा धीरज घाटेच कारभारी.. बिडकर, भिमालेंच्या पदरी निराशा…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube