महायुतीत वादाची ठिणगी! पराभवाचे खापर विखेंच्या माथी; राष्ट्रवादीचे नेते का चिडले?
Ahmednagar Lok Sabha : लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा (Ahmednagar Lok Sabha) फटका बसल्याचे दिसले. कांदा निर्यातबंदी व दुधाच्या दराबाबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhkrishna Vikhe) यांनी हा प्रश्न गांभीर्याने न घेतल्याने याचा फटका महाराष्ट्रामध्ये महायुतीला बसला. तसेच या प्रश्नाबाबत मंत्री राधाकृष्ण विखे व माजी खासदार सुजय विखे यांना कल्पना देण्यात येऊनही त्यांनी आमचे कधी ऐकूनच घेतले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला फटका बसल्याची खदखद राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नगर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी व्यक्त केली.
आगामी काळात होणारा विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) अनुषंगाने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची एक महत्त्वाची बैठक नगर शहरात पार पडली. यातील प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीच्या पराभवावर भाष्य केले. यावेळी त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे व माजी खासदार सुजय विखे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
‘भारताने वर्ल्डकप जिंकला, आम्ही विधानसभा जिंकणार’ मंत्री विखेंना फुल कॉन्फिडन्स
नाहाटा म्हणाले की, महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वाधिक फटका बसला तो म्हणजे कांदा निर्यातबंदी. कांदा निर्यात बंदीबाबत तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा याचा मोठा फटका निवडणुकीत बसेल असे आम्ही सातत्याने सांगत होतो. दुधाच्या दराने देखील लोकसभा निवडणुकीत फटका बसला आहे. खुद्द दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातात या सर्व काही गोष्टी असताना देखील या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने याचा मोठा फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसला असा आरोप नाहाटा यांनी यावेळी केला.
राज्यात महायुतीला जो फटका बसला जी काही पडझड झाली याला अप्रत्यक्षरीत्या विखे कारणीभूत आहेत. निवडणुकीनंतर आता शासन दूधदराबाबत जागे झाले आणि निर्णय देखील घेतला. मात्र हाच निर्णय आधीच घेतला असता तर लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला नसता असं देखील यावेळी नहाटा यांनी स्पष्ट केले.
नाहाटा यांनी मंत्री राधाकृष्ण विखे व माजी खासदार सुजय विखे यांच्यावर पराभवाचे खापर फोडले. कांदा व दुधाच्या प्रश्नाबाबत हे दोघेही गंभीर नव्हते यामुळेच लोकसभा निवडणुकीत नगरमध्ये फटका बसल्याचे देखील यावेळी नाहाटा यांनी बोलून दाखवले. तसेच वेळोवेळी याबाबत कल्पना देखील आम्ही देण्याचा प्रयत्न करत होतो मात्र त्यांनी आमचे ऐकून घेतले देखील नाही असे देखील खदखद यावेळी नाहाटा यांनी व्यक्त केली.
Loksabha Election Result : भाजप न हारले न जिंकले; 400 पारची गणितं कुठे आणि कशी चुकली?