“राधाकृष्ण विखेंशी संघर्ष झाला तरी भाजप सोडणार नाही”; गुलाल उधळल्यानंतर कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया

“राधाकृष्ण विखेंशी संघर्ष झाला तरी भाजप सोडणार नाही”; गुलाल उधळल्यानंतर कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया

Ganesh Faetory Election : राहाता तालुक्यातील आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्या मतदारसंघातील गणेश सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि भाजपचे विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्या पॅनलने विखेंना पराभवाची धूळ चारली. यानंतर आता विखे कोल्हे असा नवा संघर्ष सुरू होणार, जिरवाजिरवीचे राजकारण होणार, अशा चर्चा रंगल्या होत्या.

मात्र ही युती फक्त निवडणुकीपुरतीच होती. आम्हाला कुणाचीही जिरवायची नाही. ज्या पक्षात आलो त्या पक्षाचे काम प्रामाणिकपणे करायचं हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्ही भाजप सोडणार नाही, असे भारतीय जनता पार्टीचे नेते तथा गणेश कारखाना निवडणुकीतील विजयाचे शिल्पकार विवेक कोल्हे यांनी सांगितले. निवडणुकीतील विजयानंतर लेट्सअप मराठीने कोल्हे यांच्याशी संवाद साधला. यावेळी कोल्हे यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक मते व्यक्त केली.

गणेश कारखान्यातील पराभवानंतर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया, ‘प्रवरामध्ये सत्तांतर झाले तर…’

आम्हाला कुणाची जिरवायची नाही, भाजप सोडणारही नाही

भाजपात अन्याय होतो असे वाटत नाही. विखेंच्या विरोधात आम्ही उतरलोच नाही. सभासद व शेतकऱ्यांसाठी आम्ही निवडणुकीत उतरलो. निवडणूक संपली विरोध संपला. आमचा विरोध कुणा व्यक्तीला नाही. प्रवृत्तीला विरोध आहे. सगळ्यांचा हेतू एक होता म्हणून एक पॅनला दिला. ही युती फक्त या निवडणुकीपुरती होती. पाणी अडवा पाणी जिरवा व शेतकऱ्यांचा विकास साधा हा हेतू होता.

आम्हाला कुणाची जिरवायची नव्हती. एकत्र येऊन केटीवेअर थोरात कोल्हे युती केली. आता त्याचे वेगळे अर्थ काढले जात आहेत. दरी वाढावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आम्ही तत्वांचं राजकारण केलं. पक्षात राहिलो त्याचे प्रामाणिकपणे काम केलं. दहा वर्षे काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत असताना पण आमचे प्रश्न काही सुटले नाहीत. त्यामुळे आम्ही पक्ष सोडून भाजपमध्ये आलो. आता पुन्हा भाजप सोडण्याचा विचार नाही, असे कोल्हे म्हणाले.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि तुम्ही भाजपात असतानाही तुम्ही त्यांच्याविरोधात शड्डू ठोकला याचे कारण काय? या प्रश्नाच्या उत्तरात कोल्हे म्हणाले, आम्ही त्यांच्या विरोधात नाही तर गणेशच्या समर्थनात शड्डू ठोकला. सहकारात पक्ष बघितला जात नाही. राजकारणात अशी अनेक उदाहरणे घडलेली आहेत. सहकारात पक्षाची झालर मी लावू इच्छित नाही. बाकी या मागे दुसरे काही कारण नाही.

‘आता त्यांना आनंद घेऊ द्या मी व्यत्यय आणणार नाही पण, वेळ आल्यावर’.. विखेंचा थोरातांना इशारा

या राजकारणाचा फटका कोल्हे कुटुंबाला 2024 च्या निवडणुकीत फटका बसू शकतो अशी चर्चा आहे. त्यावर कोल्हे म्हणाले, ही सहकारी संस्थेची निवडणूक होती. राज्याचे नेतृत्व सहकारी संस्थेच्या निवडणुकीत विधानसभेची भाषा करतात निवडणुकीत पाहून घेऊ म्हणतात हे चुकीचे आहे. आमची जनता सूज्ञ आहे आमचं काय करायचं ते पाहून घेतील, असं मी बोललो होतो. त्यादृष्टीने त्याकडे पाहिले जाऊ नये असे आमचे म्हणणे होते.

अनेक निवडणुकीत काळे आमच्या विरोधात उभे असतात पण मार्केट कमिटीच्या निवडणुकीत आम्ही त्यांच्याशी युती केली. त्यामुळे आम्ही आणि काळे एक झालो असे म्हणण्याचे काही कारण नाही. मंत्री विखे यांचे मेहुणे राजेश परजणे विरोधात होते. त्यांच्यामुळे आमचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तरी देखील आम्ही त्यांना सामावून घेऊन मार्केट कमिटीत दोन जागा दिल्या. त्यामुळे पक्षाचा यात काही विषय येत नाही.

दहशतीच्या झाकणाचा झाला उलगडा 

या निवडणुकीत दहशतीचे झाकण उघडले असा शब्दप्रयोग झाला त्याचे नेमके कारण काय, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कोल्हे म्हणाले, दहशतीचे झाकण उघडले हा शब्दप्रयोग थोरात साहेबांनी केला होता. त्याची प्रचिती आम्हाला वेळोवेळी आली. आम्ही हात जोडून मत मागितली. पण आम्हाला दाखले मिळायला अडचण, सभेच्या परवानग्या मिळायला अडचण, कुणी अर्ज भरला असेल त्यात त्रुटी काढायच्या त्यामुळे दडपशाही आहे याची आमची खात्री झाली. या दडपशाहीचे सावट झुगारून सभासदांनी हा कौल दिला आहे.

कारखाना विखेंनी सावरला आता तुमच्याकडे आला तर तसाच राहिल का अशी चर्चा आहे. या चर्चेचे खंडन करताना कोल्हे म्हणाले, मुळात हा कारखाना 1989 मध्ये हा कारखाना बंद झाला होते. शंकरराव कोल्हे साहेबांनी नतंर ताब्यात घेतला. त्यांच्या सहकाऱ्यांनी अडचणीतील कारखाना बाहेर काढून गणेश पॅटर्न राज्यात रुजवला. उपाययोजना केल्या. आता हा कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत होता की राजकीय दृष्ट्या हा संशोधनाचा विषय आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube