बाजार समितीतही विखे-थोरात, शिंदे-पवार संघर्ष ; बंडखोरीने नेते मंडळी हैराण !

बाजार समितीतही विखे-थोरात, शिंदे-पवार संघर्ष ; बंडखोरीने नेते मंडळी हैराण !

Market Committee Elections : बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी होत असललेल्या या निवडणुका राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. त्यामुळेच तर मातब्बर नेत्यांनी निवडणुकीत पॅनल उभे केले आहेत. उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी झंझावाती दौरे सुरू केले आहेत. प्रचार सभांतून जोरदार आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत, त्यामुळे गावकीचे राजकारण ढवळून निघाले आहे.

या निवडणुकीत एक गोष्ट स्पष्टपणे जाणवत आहे. ती म्हणजे, निवडणूक बाजार समितीची असली तरी या निवडणुकीत थेट मंत्र्यांपासून आमदार खासदारांचेही लक्ष आहे. कार्यकर्त्यांची सोय आणि त्यामाध्यमातून बाजार समितीच्या चाव्या आपल्या ताब्यात घेण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

मला पिढीचंच आश्चर्य वाटतं… राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण

या निवडणुकीत जिल्ह्यातील दिग्गज नेते आमनेसामने आले आहेत. पारनेरमध्ये आमदार निलेश लंके आणि माजी आमदार विजय औटी एकत्र आले आहेत. ज्या लंके आणि औटी यांच्यात विस्तवही जात नव्हता. नगरपालिकेच्या निवडणुकीतही लंकेंनी औटींना चांगलाच झटका दिला होता. तरी देखील पारनेर तालुक्यात विखेंचा वाढता हस्तक्षेप थोपविण्यासाठी दोघांनी आघाडी केल्याचे बोलले जात आहे. मात्र, ही आघाडी झाली असली तरी नाराजीचे सूर उमटले आहेत. काही समर्थक कार्यकर्त्यांनी आघाडी करताना आम्हाला विश्वासात घेतले नाही म्हणून वेगळा पवित्रा घेतल्याचे सांगितले जात आहे.काही भाजप प्रणित पॅनलच्या उमेदवारांचा प्रचार केल्याचेही समजते.

नगर बाजार समितीत जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी दोन जागा बिनविरोध करत आघाडी घेतली आहे. येथे तालुक्यातील महाविकास आघाडीचे कडवे आव्हान त्यांच्यासमोर असून बाजार समितीची सत्ता हिसकावून घेण्यासाठी या आघाडीतील नेत्यांनीही प्रयत्न सुरू केले आहेत.

शेवगावमध्ये घुलेंच्या विरोधात भाजप आमदार मोनिका राजळेंना काँग्रेस आणि मनसेचीही साथ मिळाली आहे. नेवासा बाजार समितीत आमदार शंकरराव गडाख यांच्या गटातील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे आता विरोधात गेले आहेत. गडाख विरोधात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व विठ्ठलराव लंघे गटात लढत रंगली आहे.

प्राजक्त तनपुरेंवर सुजय विखेंचा हल्लाबोल, ‘एकदाही कारखाना नफ्यात चालवला नाही’

श्रीगोंद्यात तर एकेकाळचे कट्टर विरोधक असलेले राजेंद्र नागवडे आणि भाजप आमदार बबनराव पाचपुते एकत्र आले आहेत. जगताप गटाकडून साजन पाचपुते आणि मितेश नाहाटा यांची उमेदवारी लक्ष वेधणारी ठरत आहे.

श्रीरामपूर बाजार समिती निवडणुकीत महसूलमंत्री विखे यांनी मध्यस्थी केल्यानंतर माजी आमदार भानुदास मुरकुटे, करण ससाणे एकत्र आले आहेत. त्यांच्या विरोधात आमदार लहू कानडे, अविनाश आदिक आहेत.

कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे समर्थक एकत्र आले आहेत. या समितीतही तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. कर्जत आणि जामखेड बाजार समितीत तर भाजप आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यातच खरा संघर्ष आहे.

एकूणच निवडणूक बाजार समितीची असली तरी खरा राजकीय संघर्ष हा जिल्ह्यातील नेत्यांमध्येच सुरू असल्याचे दिसत आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, शिवाजी कर्डिले विरुद्ध आ. प्राजक्त तनपुरे, खासदार सुजय विखे, आमदार निलेश लंके तसेच आमदार राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात संघर्ष रंगल्याचे दिसत आहे.

सात समित्यांसाठी उद्या मतदान

जिल्ह्यातील नगर, राहुरी, संगमनेर, पाथर्डी, कर्जत, श्रीगोंदा आणि पारनेर या सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी उद्या (28 एप्रिल) मतदान होत आहे. 29 एप्रिल रोजी शुक्रवारी मतमोजणी होणार आहे. राहुरी बाजार समितीतील मतदानाची मात्र लगेचच मतमोजणी होणार आहे. तर अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, शेवगावा, राहाता, नेवासा आणि जामखेड या बाजार समित्यांसाठी 30 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube