नगर तापले ! व्यापाऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद, व्यापाऱ्यांचा ठिय्या
Ahmednagar News : नगर शहरातील कापड बाजारात काल दोन व्यापाऱ्यांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज (शनिवार) कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. या हल्ल्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत असून व्यापाऱ्यांनी आज आपले व्यवहार बंद ठेवत या घटनेवर संताप व्यक्त केले. यावेळी व्यापारी महासंघासह अन्य व्यापाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. यामध्ये शहरातील राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी तसेच व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
‘नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी’, ‘हम सब एक है’, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. शहरातील कापडबाजार, तेलीखुंट सह आसपासच्या भागातील दुकाने बंद होती. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
अहमदनगरमधील शांतता भंग करणाऱ्या धर्मांधांना आवरा; मनसे आक्रमक
कापड बाजारात काल सायंकाळी झालेल्या किरकोळ वादातून व्यापाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दीपक नवलानी हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कापड बाजार येथे गाडी लावण्यावरून दीपक नवलानी या व्यापाऱ्याशी काही जणांनी हुज्जत घातली. त्यानंतर नवलानी व इतर दाेन जणांवर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. त्यात नवलानी गंभीर जखमी झाले. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला होता.
अहमदनगरच्या कापड बाजारात गुंडगिरी, व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला
दरम्यान, या घटनेवर व्यापारी वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील कापड बाजारात अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर बनला आहे. ही अतिक्रमणे हटविण्यासाठी व्यापाऱ्यांनी याआधीही आंदोलन केले होते. मात्र, त्यावर थातुरमातुर आश्वासनापलीकडे काहीच झाले नाही. प्रशासनाच्या या कारभारावर आंदोलनात सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच येथून पुढे अशा घटना अजिबात सहन केल्या जाणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.