एकीकडे कौतुक तर दुसरीकडे पंचनामा; नाशकात शिंदेंनी काढली मविआची लक्तरं

एकीकडे कौतुक तर दुसरीकडे पंचनामा; नाशकात शिंदेंनी काढली मविआची लक्तरं

Eknath Shinde : ‘आधीच्या अडीच वर्षांच्या सरकारच्या काळात अनेक प्रकल्प, योजना थांबविण्यात आल्या. देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या योजनाही बंद केल्या. त्यानंतर सरकार बदलले. आम्ही सत्तेत येताच हे सर्व ब्रेक काढून टाकले. विकासकामांना चालना दिली. त्यामुळे कितीही आरोप केले तरी आम्ही थांबणार नाही’, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अजित पवार यांच्यासमोरच तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला. अजित पवार सरकारमध्ये आले आहेत म्हणून त्यांचे स्वागतही केले. त्यांच्या कामाच्या पद्धतीचे कौतुक केले दुसरीकडे मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये ते मंत्री असताना तेव्हाच्या सरकारने कशा पद्धतीने कामे अडवली याचा उल्लेख केला.

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिंदे स्वतः मंत्री होते. तर अजित पवार अर्थमंत्री होते. आता महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तर अजित पवार पुन्हा अर्थमंत्री बनले आहेत. आताही नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी संधी साधत महाविकास आघाडी सरकावर टीका केली.

अजितदादांची प्रत्येक फाईल माझ्याकडे येणार! नाराज आमदारांना फडणवीसांचा ‘शब्द’

शिंदे पुढे म्हणाले, ‘दारोदार फिरून लोकांचे काम करण्यासाठीच हे सरकार सत्तेत आले आहे. घरी बसून राहण्यासाठी सत्ता नसते. ती लोकांच्या घरी जाऊन राबवायची असते. घरी बसणाऱ्यांना जनता घरीच बसवते आणि लोकांतील कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी देते’, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांना लगावला.

‘अजितदादा इथे बसलेत. अजितदादांनी सुद्धा मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखविला. सरकारमध्ये अजितदादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भर पडली. आता सरकार आधिक वेगाने काम करेल. आधीच्या अडीच वर्षांच्या काळात सर्व कामे ठप्प पडली. अनेक प्रकल्प थांबवले गेले. नंतर युतीचं सरकार आले आणि ब्रेक काढले कामांना चालना दिली. कुणी कितीही आरोप केले तरी आम्ही थांबणार नाही. शासन आपल्या दारी कार्यक्रम थांबणार नाही’, असे शिंदे म्हणाले.

कितीही टीका करा, धारावीचं रुपडं अदानीच बदलणार; शासनाचा ‘जीआर’ धडकला!

 

तीन जण एकत्र पण, आम्ही सगळी समजूतदार

‘काही लोक म्हणत आहेत की तीन जण एकत्र आले कसं होणार, पण आम्ही सगळी समजूतदार आहोत. मी आणि फडणवीस मित्र आहोत. त्यांच्या मंत्रिमंडळात मी सुद्धा मंत्री होतो. आता मी मुख्यमंत्री म्हणून काम करतोय ते उपमुख्यमंत्री आहेत, अजितदादा आलेत. मी खरं सांगतो देवेंद्रजीचं मन मोठं आहे. त्यांनी हसतमुखाने अजित पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून स्वीकारलं. हा मोठ्या मनाचा माणूस आहे. ते स्वतःला उपमुख्यमंत्री समजत नाहीत. मीही स्वतःला मुख्यमंत्री समजत नाही. हा त्यांचा मोठेपणा आहे. त्यांच्यावर कलंक लावण्याचं काम केले जात आहे. पण निष्कलंक म्हणून त्यांचे नाव अभिमानाने घेतले पाहिजे. पण त्यासाठी मोठेपणा लागतो. कद्रूपणा चालत नाही’, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

आमदार-खासदारांवर अन्याय होणार नाही

‘मी सांगतो दोन उपमु्ख्यमंत्र्यांना सोबत घेऊन आमदार खासदार कुणावरच अन्याय होणार नाही. विरोधकांची वज्रमूठ वज्रझूठ ठरली. मोट बांधायला निघाले त्यांची बोट फुटली. विरोधी पक्षाचा नेताही ठरवता आला नाही. यातच मोदींचा विजय आहे’, असे शिंदे म्हणाले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube