भुजबळांना मंत्रिपद हा फडणवीसांचा डाव? एकनाथ शिंदेंचं नाव घेत जरांगेंनी काय सांगितलं..

Manoj Jarange on Chhagan Bhujbal Minister Post : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील आमदार छगन भुजबळ यांची (Chhagan Bhujbal) मंत्रिमंडळात एन्ट्री झाली आहे. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी आज भुजबळांना मंत्रिपदाची शपथ दिली. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भुजबळांना मंत्रिपद दिल्यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर घणाघाती टीका केली. छगन भुजबळांना मंत्रिपद देण्यामागे फडणवीसांचा डाव असू शकतो असा संशय जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना ताज्या राजकीय घडामोडीवर भाष्य केले. ते पुढे म्हणाले, छगन भुजबळला मंत्रिपद द्या हा डाव देवेंद्र फडणवीस यांचा असू शकतो. मराठा संपवण्याचा विडा देवेंद्र फडणवीसांनी घेतला आहे. देवेंद्र फडणवीसला एकनाथ शिंदे यांनी प्रवाहात आणलं त्या माणसाला फडणवीसांनी क्रॉस करून टाकलं. काम झालं की वापरून फेकून देणारा माणूस देवेंद्र फडणवीस आहे अशी घणाघाती टीका जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
अजित पवार मोठी चूक करताहेत
छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली किंवा नाही घेतली हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. छगन भुजबळ मंत्री झाले याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही. अजित पवार जातीयवादी लोकं पोसायचं काम करत आहेत. अजित पवार प्रचंड मोठी चूक करत आहेत. याच्या परिणामाला त्यांना सामोरे जावं लागेल. जो मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करत आहे त्याला मंत्रिपद दिलं जात आहे. आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आल्याने छगन भुजबळला तात्पुरता आनंद दिला असेल. पण, या आनंदावर नक्कीच विरजण पडेल असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला.
भुजबळांची एन्ट्री अन् निवडणूक रणनीती
छगन भुजबळ यांचे मंत्री होणे हे केवळ राजकीय पुनरागमनच नाही तर, महायुतीच्या निवडणूक रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारला प्रशासकीय बळचं नव्हे तर, आगामी महानगरपालिका, आणि जिल्हा परिषद निवडणुकीत ओबीसी आणि प्रादेशिक पाठिंब्याच्या स्वरूपात महायुतीला मोठा फायदाही मिळण्याची शक्यता आहे. जर भुजबळांनी त्यांची प्रभावीशक्ती योग्यरित्या वापरली तर, ते भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी “गेमचेंजर” ची भूमिका बजावू शकतात.