Uddhav Thackeray : ठाकरेंकडून नाशिक ‘फ्रिज’; भुजबळांच्या बालेकिल्ल्यातून मोदींना करणार ‘चेकमेट’
Uddhav Thackeray Group Session in Nashik : बरोबर 12 जानेवारीचा दिवस. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला (Ayodhya Ram Mandir) अकरा दिवस राहिलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नाशिकमध्ये आले. भव्य रोड शो झाला. त्यानंतर मोदी रामकुंडावर गेले. येथे पूजा केली. त्यानंतर थेट काळामंदिरात श्रीरामाचे दर्शन घेतले. दुपारी युवा महोत्सवास हजेरी लावून प्राणप्रतिष्ठेसाठीच्या अकरा दिवसांच्या अनुष्ठानाची घोषणा केली. महोत्सावास उपस्थितांना संबोधित करताना विरोधकांना चिमटेही घेतले. घराणेशाहीच्या राजकारणावर टीका केली. एका अर्थाने ठाकरे गटावर कुरघोडी करण्याचा उद्देशही यामागे होताच. मोदींचा दौरा आटोपल्यानंतर ठाकरे गटाचेही ‘नाशिक पॉलिटिक्स’ सुरू झाले आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कालपासूनच नाशिकमध्ये दाखल झाले. काळाराम मंदिरात पूजा केली. तसेच अयोध्या आंदोलनातील कारसेवकांच्या हस्ते गोदातिरी महाआरती करण्यात आली. आज (मंगळवार) ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याचा दुसरा दिवस. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. या खास दिवसाचे औचित्य साधून नाशकात ठाकरे गटाच्या राज्यस्तरीय अधिवेशनास सुरुवात झाली आहे. राज्यातील राजकीय घडामोडी आणि आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने अधिवेशनाला महत्व प्राप्त झाले आहे.
पीएम मोदींनंतर ठाकरे गटाचेही ‘नाशिक’ पॉलिटिक्स; 22-23 जानेवारीला महाआरती अन् अधिवेशन
अधिवेशनाचे राजकीय महत्व काय?
शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाचे हे पहिलेच मोठे अधिवेशन नाशिक शहरात होत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अधिवेशन भरवण्यात आले आहे. अधिवेशनासाठी नाशिकची (Nashik) निवड मुद्दाम करण्यात आली आहे. नाशिकमध्येच अधिवेशन भरवण्यात येत असून या अधिवेशनला दोन हजारांपेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. या अधिवेशनात माजी उद्योगमंत्री अनिल देसाई काही महत्वाचे संघटनात्मक ठराव मांडणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही काही राजकीय ठराव होणार आहेत. या अधिवेशनात पक्षाची पुढील वाटचाल काय असेल यावरही चर्चा होणार आहे. त्यामुळेच ठाकरे गटासाठी आजचे अधिवेशन महत्वाचे ठरणार आहे.
PM Modi : श्रीराम मंदिरासाठी PM मोदींचे 11 दिवसांचे अनुष्ठान; आज नाशिकच्या पंचवटीतून सुरुवात
शिवसेना आमदार अपात्रत प्रकरणाचा (MLA Disqualification) निकाल आला त्यावेळी सांगण्यात आले होते की याआधी जी अधिवेशने झाली होती त्यांची कागदपत्रे पोहोचलेली नाहीत. त्यानंतर वादही निर्माण झाला होता. यानंतर उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषद घेतली होती. या गोष्टींचा विचार केला तर आजचं अधिवेशन महत्वाचे ठरत आहे. या अधिवेशनाच्या नियोजनावर स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे लक्ष ठेऊन होते. या अधिवेशनात महत्वाच्या नेत्यांची भाषणे होणार आहेत. उद्धव ठाकरेही मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सायंकाळी जाहीर सभा होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरेंचे भाषण होणार आहे. नाशिक हा अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा बालेकिल्ला मानला जातो. येथून उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
प्राणप्रतिष्ठा दिनी ठाकरेंचा भगवा ‘लूक’
काल (सोमवार) अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्याचे निमंत्रण उद्धव ठाकरेंना दिले गेले होते. मात्र उद्धव ठाकरेंनी या सोहळ्याकडे पाठ फिरवत नाशिक गाठले. येथे काळाराम मंदिरात पूजा केली. गोदावरी नदी तीरावर महाआरतीही केली. यावेळी एक गोष्ट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. ती म्हणजे उद्धव ठाकरेंचा भगवा लूक. अंंगात भगव्या रंगाता कुर्ता, गळ्यात रुद्राक्षांची माळ अशा लूकमध्ये ठाकरे दिसले. त्यांच्या या पोशाखाची जोरदार चर्चा सुरू होती.
फलकाची जोरदार चर्चा
अधिवेशनासाठी भव्य व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. व्यासपीठावर आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसाठी खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. राज्यभरातून दोन हजारांपेक्षा जास्त कार्यकर्ते पदाधिकारी येतील असा अंदाज आहे. या लोकांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सगळ्यांमध्ये व्यासपीठावरील फलक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या फलकावर फक्त बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचेच फोटो आहेत. बाकी एकाही पदाधिकाऱ्याचा फोटो नाही.