‘आम्ही मुंडे साहेबांचीच माणसं, त्यांच्या नावाने हॉस्पिटलही होईल आणि स्मारकही; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा..
Eknath Shinde : राज्य सरकार हे शेतकरी कष्टकऱ्यांचे सरकार आहे. आता जो अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला त्यामध्ये समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्यात आले आहे. शेतकरी हा सरकारचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळेच तर आता राज्याच्या विकासावरील मळभ दूर करण्यासाठी महायुतीचे शिवधनुष्य हाती घेतले आहे.
आम्ही मुंडे साहेबांचीच माणसं आहोत त्यामुळे त्यांच्या नावाने हॉस्पिटलही होईल आणि स्मारकही होईल. ऊसतोड कामगार महामंडळाचे बळकटीकरण होईल तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहे युद्धपातळीवर उभारण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे या गावात गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक आणि पुर्णाकृती पुतळा अनावरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. छगन भुजबळ, आ. बाळासाहेब थोरात, खासदार प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे आदी उपस्थित होते. यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील गोपीनाथ मुंडेंच्या पुतळ्यासह रुग्णालयाचीही घोषणा त्यांनी केली.
शिंदे पुढे म्हणाले, की अवकाळी पाऊस सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. जितके नुकसान होईल तितके सगळे नुकसान आम्ही भरून देऊ. शेवटी कष्टकरी, शेतकऱ्यांचेच हे सरकार आहे. तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांवर चालणारे हे सरकार आहे.
वाचा : चाळीस आमदार परत येतील पण, एकनाथ शिंदे.. राऊतांनी सांगितले खरे कारण
गोपीनाथ मुंडेंना सर्वसामान्य नागिरकांना न्याय देण्यासाठी संघर्ष केला. त्यांनी सायकलवर प्रसंगी पायी प्रवास करून भाजप वाढविला. गोपनाथ मुंडे व प्रमोद महाजन युतीचे शिल्पकार होते. बाळासाहेंबावर त्यांची श्रद्धा होती. बाळासाहेबांचाही त्यांच्यावर विश्वास होता. याचे आम्ही साक्षीदार आहोत.
संघर्षाच्या काळात बाळासाहेब गोपीनाथ मुंडेंना मार्गदर्शन करायचे. त्यांचे माझ्यावरही प्रेम होते. काही गोष्टी ते मनातल्या सांगायचे. पण हा मोठा नेता अकाली निघून गेला. तो काळा दिवस होता. या नेत्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी लोक रडत होते. वाट शोधत होते. हे चित्र फार दुर्मिळ होते. यासाठी त्याग आणि संघर्ष करावा लागतो, असे शिंदे म्हणाले.
‘मविआ’तील सगळेच पक्ष अनिल जयसिंघानी फिरला, त्यामुळे.. एकनाथ शिंदेंनी दिला इशारा
सध्या आम्ही गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन काम करत आहोत. ही राज्याची गरज होती. म्हणून सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आम्ही आणले. राज्य सर्वसामान्यांचे आहे. राज्याच्या प्रगती व विकासावरील मळभ दूर करण्यासाठी महायुतीचे शिवधनुष्य हाती घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या वसतिगृहांचा प्रश्न राहणार नाही. सगळी वसतिगृहे युद्ध पातळीवर उभी राहतील. ऊसतोड कामगार महामंडळाचेह बळकटीकरण करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.