मालेगावात माजी नगरसेवकावर हल्ला; धारदार शस्त्राने केले सपासप वार, हाताची बोटंही कापली..
Malegaon News : मालेगाव शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. काही दिवसांपूर्वी माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावरील गोळीबाराची घटना ताजी असतानाच मालेगाव पुन्हा हादरलं आहे. माजी नगरसेवक आणि त्यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. मोटारसायकलवर आलेल्या टोळक्याने त्यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात त्यांच्या हाताची बोटे कापली गेली आहेत. काल मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
या हल्ल्यात माजी नगरसेवक अझीझ लल्लू आणि त्यांचा मुलगा जखमी झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला का करण्यात आला याचं उत्तर अजून मिळालेलं नाही मात्र पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाला असावा अशी चर्चा आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, येथील मदिना चौकात तीन ते चार जण मोटारसायकलवरून आले. यानंतर त्यांनी अझीझ लल्लू आणि त्यांच्या मुलावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. इतकंच नाही तर य हल्ल्यात त्यांच्या हाताची बोटंही कापली गेली आहेत. हल्लेखोरांनी त्यांच्या मुलावरही हल्ला केला. या हल्ल्यात मुलाच्या पाठीवर वार करण्यात आले
हॉटेलवर चहा घेताना माजी महापौरावर झाडल्या गोळ्या; मालेगावमधील धक्कादायक घटना
मालेगावात गुन्हेगारीत वाढ
मालेगाव शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे. या अगोदर देखील या भागामध्ये दोन अज्ञात तरुणांनी दुचाकीवरून येत एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर यावेळी त्यांनी हवेमध्ये गोळीबार करत पेट्रोल पंपावर असलेल्या कर्मचाऱ्याला धमकी देत खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर थेट माजी महापौरांवरच हल्ला झाला होता. आता पुन्हा माजी नगरसेवकावर हल्ला झाल्याने शहरात तणाव वाढला आहे.