ठाकरेंना दिलासा! राज्यातील ‘या’ मतदारसंघात होणार फेर मतमोजणी; कारण काय?
Nashik News : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं अभूतपूर्व यश मिळवलं. भाजपनं तब्बल 132 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान पुन्हा मिळवला. तर एकनाथ शिंदे शिवसेना 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही 41 आमदार निवडून आणत दमदार कामगिरी केली. यानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र मुख्यमंत्री कोण होणार यावर घोडं अडलं आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी ईव्हीएमवरून रान उठवण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने ईव्हीएम विरोधात देशव्यापी आंदोलनाची तयारी केली आहे. तर आता ठाकरे गटालाही निवडणूक आयोगाकडून (Election Commission) दिलासा मिळाला आहे. नाशिक पश्चिम मतदारंसघातील ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी ईव्हीएम मतांची फेरमोजणी करण्याची मागणी केली होती. ही मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.
मुख्यमंत्रिपदाचा तिढा कायम, भाजपाच्या शिंदेंना दोन ऑफर; शिंदेंनी केल्या अमान्य?
नाशिक जिल्ह्यातील नाशिक पश्चिम मतदारसंघातील निवडणूक चांगलीच गाजली. या मतदारसंघात यंदा कमळ फुललं. महायुतीच्या उमेदवार सीमा हिरे यांनी 1 लाख 41 हजार 725 मते मिळवत विजय साकारला. ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांचा 68 हजार 177 मतांनी पराभव झाला. या निवडणुकीत बडगुजर यांना एकूण 73 हजार 548 मते मिळाली. तर मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांनी 46 हजार 649 मते घेतली. यानंतर अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार झाल्याचा दावा करण्यात आला होता. मयत व्यक्तींच्या नावानेही मतदान झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
यानंतर पराभूत उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी स्वतः पुढाकार घेत ईव्हीएम मशीनमधील मतांची फेरमोजणी करण्याची मागणी केली होती. बडगुजर यांनी या निकालावर आक्षेप घेतला आणि फेरमोजणी करण्याची मागणी केली होती. निवडणूक आयोगानेही या मागणीची दखल घेत मागणी मान्य केली आहे. यानंतर निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सुधाकर बडगुजर यांना तसे पत्र दिले आहे.
पाच टक्के केंद्रातील मतमोजणी होणार
आता बडगुजर यांना एकूण मतदान केंद्रांच्या पाच टक्के केंद्रांची फेर मतमोजणी करण्याची परवानगी राहणार आहे. यासाठी खर्चही होणार आहे. प्रति युनिट 40 हजार रुपये अधिक जीएसटीची रक्कम भरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पाच टक्के केंद्रांची फेर मतमोजणी करण्यात येणार आहे. आता या मतमोजणीचा निकाल काय लागणार याची उत्सुकता आहे.
नाशिक पश्चिममध्ये मतदान यंत्र अन् व्हीव्हीपॅटमध्ये बदल; ठाकरे गटाच्या नेत्याची निवडणूक आयोगात धाव