भाजपातील प्रवेश कुणी रोखला? नाथाभाऊंचा ‘या’ दोन नेत्यांवर राग..
Eknath Khadse Criticized Devendra Fadnavis : सर्वांनाच माहिती आहे की देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि गिरीश महाजन यांच्याकडून (Girirsh Mahajan) माझ्या पक्षप्रवेशाला विरोध होण्याची शक्यता होती. मी या दोघांची नावं अगदी स्पष्ट घेतोय. या मुद्द्यावर गिरीश महाजन सातत्याने प्रतिक्रिया देत आले आहेत. आता मला असा प्रश्न पडला आहे की नड्डाजी मोठे आहेत की राज्यातील नेते? असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी संताप व्यक्त केला.
असे कोणते नेते आहेत ज्यांच्यामुळे तुमचा पक्ष प्रवेश रोखला गेला असा प्रश्न विचरला असता खडसे म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या फक्त 9 जागा निवडून आल्या. महाराष्ट्रात भाजपाची परिस्थिती नाजूक आहे असे सर्व्हे आणि बातम्या येत होत्या. त्यामुळे भाजपला बळकटी मिळावी या हेतूने वरिष्ठांनी मला प्रवेशाची सूचना केली असावी.
ज्यावेळी रक्षाताई निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या. त्यावेळी मी त्यांना मदत केली. नंतर त्या निवडूनही आल्या. इथपर्यंत सगळं ठीक होतं. नंतर मात्र नाथाभाऊंच्या प्रवेशाचा आम्ही विरोध करतो, त्यांना आम्ही साथ देणार नाही, आमचं केडर बंद पडेल असे मुद्दे पुढे केले गेले. खरंतर चाळीस वर्ष खस्ता खाऊन राज्यात भाजप उभा केला. आज जे मला विरोध करत होते त्यावेळी ते माझ्याच हाताखाली काम करत होते. आता मला विरोध करत आहेत. तसाही मी भाजपात जाण्यास इच्छुक नव्हतोच. भाजपाच्या वरिष्ठांनी सूचना केली म्हणून मी प्रवेशाची तयारी केली होती. शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याबरोबर चर्चा करूनच मी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला होता.
“मी राष्ट्रवादीतच, नड्डांनी गळ्यात मफलर टाकला होता पण..”, भाजपप्रवेशाला नाथाभाऊंचा फुलस्टॉप!
फडणवीस-महाजनांनी आतून विरोध केला
तुमच्या पक्षप्रवेशाला विरोध करणारे ते दोन नेते कोण असा थेट प्रश्न विचारला. त्यावर खडसे म्हणाले, सर्वांनाच माहिती आहे की देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि गिरीश महाजन यांच्याकडून (Girirsh Mahajan) विरोध होण्याची शक्यता आहे. भाजपात प्रवेश जर झाला होता. त्यानंतर तुम्हाला पक्षाने जबाबदारी दिली नाही ही तुमची खंत आहे का? असे विचारले असता एकनाथ खडसे म्हणाले, मुळात माझ्या भाजपप्रवेशाचा फक्त फोटो काढला गेला होता. म्हणून मी भाजपाचा सदस्य झालो, कुठल्या बैठकीला गेलो असं नाही.
भाजपाचा सदस्यच नाही तर माझ्यावर पक्षानं एखादी जबाबदारी देण्याचा प्रश्नच येत नाही. माझी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याबरोबर चर्चा झाली होती. परिस्थितीची जाणीव मी त्यांना करून दिली होती. माझी अडचण पाहून त्यांनी मला संमती दिली नव्हती पण काही हरकत नाही असं म्हटलं होतं. त्यावेळी काही वेगळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे मी त्यांच्याशी चर्चा करून नाईलाजाने गेलो होतो.
विधानसभेत रोहिणी खडसेंचा प्रचार करणार
आता विधानसभा निवडणुकीत रोहिणीताई खडसे यांना मुक्ताईनगरमधून तिकीट मिळू शकतं म्हणून तुम्ही राष्ट्रवादीचं काम करताय असं काही आहे का? या प्रश्नावर खडसे म्हणाले, असा अर्थ काढला तरी त्यात काही वेगळं आहे असं मला वाटत नाही. मी राष्ट्रवादीत होतो. मी काही राष्ट्रवादी सोडलेली नव्हती. मी वारंवार सांगतोय की मी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा त्याग केलेला नव्हता. मी भाजपाचा सदस्य नव्हतो आणि आजही नाही. त्यामुळे रोहिणी खडसे उभ्या राहिल्या काय किंवा राष्ट्रवादीचा जो कुणी उमेदवार उभा राहिल, महाराष्ट्रात ज्या ठिकाणी मला सांगितलं जाईल त्या ठिकाणी मी प्रचारासाठी जाईन. हा विषय काही फक्त रोहिणी खडसेंपुरता मर्यादीत नाही. त्यांना तर मी मदत करणार आहेच.
‘महायुतीत मैत्रीपूर्ण लढती नकोतच’; अजितदादांना कोणत्या संकटाची चाहूल?
शरद पवारांनी कारवाई का केली नाही?
तुम्ही राष्ट्रवादीत असताना भाजपाच्या रक्षा खडसेंचा प्रचार केला मग शरद पवारांनी काही कारवाई केली नाही का? काही आक्षेप घेतला नाही का? असे विचारले असता खडसे म्हणाले, हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला वाटलं तर कारवाई करतील. परंतु, शरद पवार आणि जयंत पाटील या दोघांनाही या परिस्थितीची जाणीव होती. त्यामुळे त्यांनी या संदर्भात अजून तरी निर्णय घेतल्याचं दिसत नाही.