“मी राष्ट्रवादीतच, नड्डांनी गळ्यात मफलर टाकला होता पण..”, भाजपप्रवेशाला नाथाभाऊंचा फुलस्टॉप!

“मी राष्ट्रवादीतच, नड्डांनी गळ्यात मफलर टाकला होता पण..”, भाजपप्रवेशाला नाथाभाऊंचा फुलस्टॉप!

Eknath Khadse on BJP : ‘मी कधीही भाजपात प्रवेश केलेला नाही. मी आजही शरद पवारांच्या पक्षात आहे. पूर्वीही होतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा मी दिला होता परंतु, पक्षाध्यक्षांकडून स्वीकारला गेला नाही. मला भाजपात प्रवेश द्यावा अशी विनंती मी कधीच केली नव्हती. भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मला भाजप जॉइन करा, अशी सूचना केली होती. त्यांना मी विचार करतो असे सांगितले होते त्यामुळे भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या.’

‘भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मला भाजप प्रवेशाच्या सूचना दिल्या होत्या. त्यावर मी थोडा वेळ मागितला होता. मात्र त्यांच्याकडून मला वेळ कशाला हवा? तत्काळ प्रवेश करा, असे सांगितले गेले. दिल्लीत मी होतो. विनोद तावडे आणि रक्षाताई खडसे यांच्यासह मी जेपी नड्डांना (JP Nadda) भेटलो. त्यावेळी त्यांनी माझ्या गळ्यात मफलर टाकत स्पष्ट सांगितलं की तुमचा भाजप प्रवेश झाला. परंतु, या प्रवेशाला राज्यातील काही नेत्यांकडून विरोध झाला. त्यामुळे माझा प्रवेश थांबला. तशीही माझी भाजप प्रवेशाची इच्छा नव्हतीच. मात्र वरिष्ठांकडून सूचना आल्याने मी विचार केला होता’, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला.

Eknath Khadse : निवडणूक लढणार का? एकनाथ खडसेंचं चकीत करणारं उत्तर

असे कोणते नेते आहेत ज्यांच्यामुळे तुमचा पक्ष प्रवेश रोखला गेला असा प्रश्न विचरला असता खडसे म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या फक्त 9 जागा निवडून आल्या. महाराष्ट्रात भाजपाची परिस्थिती नाजूक आहे असे सर्व्हे आणि बातम्या येत होत्या. त्यामुळे भाजपला बळकटी मिळावी या हेतूने वरिष्ठांनी मला प्रवेशाची सूचना केली असावी.

ज्यावेळी रक्षाताई निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या. त्यावेळी मी त्यांना मदत केली. नंतर त्या निवडूनही आल्या. इथपर्यंत सगळं ठीक होतं. नंतर मात्र नाथाभाऊंच्या प्रवेशाचा आम्ही विरोध करतो, त्यांना आम्ही साथ देणार नाही, आमचं केडर बंद पडेल असे मुद्दे पुढे केले गेले. खरंतर चाळीस वर्ष खस्ता खाऊन राज्यात भाजप उभा केला. आज जे मला विरोध करत होते त्यावेळी ते माझ्याच हाताखाली काम करत होते. आता मला विरोध करत आहेत. तसाही मी भाजपात जाण्यास इच्छुक नव्हतोच. भाजपाच्या वरिष्ठांनी सूचना केली म्हणून मी प्रवेशाची तयारी केली होती. शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याबरोबर चर्चा करूनच मी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला होता.

फडणवीस-महाजनांनी आतून विरोध केला

तुमच्या पक्षप्रवेशाला विरोध करणारे ते दोन नेते कोण असा थेट प्रश्न विचारला. त्यावर खडसे म्हणाले, सर्वांनाच माहिती आहे की देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि गिरीश महाजन यांच्याकडून (Girirsh Mahajan) विरोध होण्याची शक्यता आहे. मी या दोघांची नावं अगदी स्पष्ट घेतोय. या मुद्द्यावर गिरीश महाजन सातत्याने प्रतिक्रिया देत आले आहेत. आता मला असा प्रश्न पडला आहे की नड्डाजी मोठे आहेत की राज्यातील नेते? या खोलात मला जायचं नाही. मी आता भाजपाचा विचार सोडून दिलाय. मी राष्ट्रवादीत आहे, राष्ट्रवादीत राहणार आणि राष्ट्रवादीचा आमदार म्हणून मी सध्या आहे.

पुढचं सरकार महाविकास आघाडीचं येऊ दे; भाजप वाटेवर असणाऱ्या खडसेंचं बाप्पाला साकडं

फडणवीस आणि महाजन यांनी थेट उघडपणे नाही पण आतून नक्कीच विरोध केला. नाथाभाऊंची भेट घ्यायची नाही इतकी दहशत भाजपाच्या केडरमध्ये आली होती. बरेचसे कार्यकर्ते येत नव्हते. मला भेटतही नव्हते. आता झालं ते झालं यावर जास्त बोलण्याची माझी इच्छा नाही असे स्पष्ट करत या मुद्द्याला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न एकनाथ खडसेंनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube