महायुतीच्या मेळाव्यात अजितदादांचा शिलेदारच गायब; आ. लंकेंच्या मनात तरी काय?

महायुतीच्या मेळाव्यात अजितदादांचा शिलेदारच गायब; आ. लंकेंच्या मनात तरी काय?

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभेच्या अनुषंगाने राज्यातील (Lok Sabha Election 2024) ३६ जिल्ह्यांमध्ये महायुतीच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे . नगर शहरात आयोजित या मेळाव्याला महायुतीच्या सर्व लोकप्रतिनिधी तसेच पदधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र निमंत्रण असताना देखील राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली आहे. यामुळे महायुतीच्या निमित्ताने जमा झालेल्या राजकीय पदधिकाऱ्यांमध्ये याची चर्चा रंगली.

निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांनी लोकसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. त्याआधी आमदार निलेश लंके सुद्धा निवडणुकीसाठी तयारी करत होते. अशा परिस्थितीत खासदार सुजय विखे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यास आमदार लंके उपस्थित राहणार का, अशीच चर्चा सुरू होती. मात्र, लंके यांनी या मेळाव्याला दांडी मारत वेगळ्याच राजकारणाचे संकेत ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिले आहेत.

Lok Sabha 2024 : होय, लोकसभा लढणारच! राणी लंकेंच्या घोषणेने नगरच्या निवडणुकीत ट्विस्ट

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीचा मेळावा रविवारी नगर शहरात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, नगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, खासदार सुजय विखे, आमदार राम शिंदे, मोनिका राजळे, आ. संग्राम जगताप आदी उपस्थित होते. या मेळाव्यात मात्र एकाच गोष्टीची जोरदार चर्चा सुरू होती. ती म्हणजे निलेश लंकेंच्या गैरहजेरीची. निलेश लंके या मेळाव्याला आलेच नाहीत.  विशेष म्हणजे मेळाव्याआधीच आमदार संग्राम जगताप यांनी आम्ही निलेश लंके यांच्या संपर्कात आहोत. लंके या मेळाव्यात येतील असा विश्वास व्यक्त केला होता.

जिल्ह्यात शिर्डी आणि नगर दक्षिण असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. उत्तेरत शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे खासदार आहेत. तर दक्षिणेची जागा भाजपाच्या ताब्यात आहे. येथे डॉ. सुजय विखे पाटील खासदार आहेत. यंदाही विखेंनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यांच्या यंत्रणेने कामाला सुरुवातही केली आहे. मात्र, यंदा विखेंना निवडणूक सोपी नाही असेच दिसत आहे. एकतर मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढली आहे. भाजप आमदार राम शिंदेही निवडणुकीसाठी तयार असल्याचे सांगत आहेत. विखे आणि त्यांच्यातील धुसफूस समोरही आली होती. दिवाळी फराळाच्या निमित्ताने राम शिंदे थेट आमदार निलेश लंकेंबरोबर दिसले होते. या राजकारणामुळे विखेंची धाकधूक वाढली आहे.

Rohit Pawar : राम शिंदे म्हणतील तसंच करा पण, चुकलं तर..; रोहित पवारांचा अजितदादांना इशारा

सध्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या बॅनरवर आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांचे फोटो दिसत आहेत. विशेष म्हणजे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यात बॅनर्स झळकले होते. यातच नवरात्रीत मोहटादेवी दर्शनाच्या बॅनर्सवर देखील लंके यांचे फोटो होते. यामुळे आता विखेंच्या विरोधात महायुतीमध्ये सहभागी असलेले आमदार निलेश लंके यांच्या पत्नी या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने आता राजकीय खळबळ उडाली आहे. या राजकारणामुळेच आमदार लंके यांनी आजच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली का, याची चर्चा सुरू होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज