अजितदादा अन् शिंदेचं भाजप काय करणार? रोहित पवारांचं खळबळजनक भाकित..
Rohit Pawar Criticized BJP : महायुतीमध्ये सारं काही आलबेल आहे अशी चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मोठं भाकित केलं आहे. रोहित पवार म्हणाले अजितदादांनी वेगळे लढावं अशी भाजपाची रणनीती असू शकते. जाणीवपूर्वक भाजपच्या नेत्यांकडून अजितदादांवर टीका केली जात आहे. जेणेकरून विधानसभा निवडणुकीत त्यांना जागा कमी देता येतील अशी भाजपाची रणनीती असू शकते. भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादीला वेगळं लढवण्याचा प्रयत्न करील. जर जुळलं नाही तर किमान एकनाथ शिंदे गटाला व अजित पवार गटाला कमी जागा कशा देता येतील व भाजपा दोनशे जागांवर निवडणूक लढवेल याबाबत विचार केला जाईल, असे महायुतीचं भाकित रोहित पवारांनी केलं.
आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार सोहळा मिरजगाव येथे पार पडला. यावेळी माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी भाजपसह महायुतीवर जोरदार टीका केली. रोहित पवार पुढे म्हणाले, सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका केली जात आहे. महायुतीने महाविकास आघाडीच्या विरोधात मोठा खर्च केला मात्र तरी स्वाभिमानी जनतेने निवडणुकीच्या माध्यमातून भाजपाला (BJP) एक वेगळे उत्तर दिले. भाजपा आता शरद पवारांना घाबरू लागला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Elections) देखील शरद पवार हे महायुतीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.
Rohit Pawar : अजितदादांनी 200 कोटी रुपये वाटलेत : रोहित पवार यांचा भेदक आरोप
रोहित पवारांचे विखेंना प्रत्युत्तर
राज्यात सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीला राज्यात दंगली घडवायच्या आहेत असं वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले होते. यावर रोहित पवार म्हणाले 2013-14 ला राष्ट्रवादी वा काँग्रेसने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिलं होतं ते टिकणार देखील होतं. मात्र त्यावेळी फडणवीस यांची कार्यकर्ते गुणरत्न सदावर्ते हे निर्णयाच्या विरोधात कोर्टात गेले. फडणवीसांनी सदावर्ते यांना सांगितलं असतं की कोर्टात जाऊ नका तर ते गेले नसते. मात्र फडणवीस यांनी तसं सांगितलं नाही.
आता महायुती सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं. शरद पवार देखील मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या भूमिकेचे आहेत. मात्र ते कोर्टात टिकणारं मिळावं. आरक्षण महायुतीने दिले व आरक्षण रद्द साठी कोर्टामध्ये पुन्हा सदावर्तेच गेले. सदावर्ते हे फडणवीस यांचे कार्यकर्ते आहेत. ओबीसी आरक्षणाच्या विरोधात भाजपाचा कार्यकर्ता कोर्टात गेला हे स्वतः भुजबळ सांगत आहेत. अशा परिस्थितीत जर मराठा समाज तसेच ओबीसी समाजाला खेळवत ठेवलं जात असेल, फक्त महाराष्ट्रात पुन्हा सत्ता आणण्यासाठी युवकांच्या भवितव्याशी खेळ चालू आहे याबाबत त्या नेत्यांनी निर्णय घ्यावा.
प्रकाश आंबेडकरांनी ठाम भूमिका घ्यावी
रोहित पवार म्हणाले प्रकाश आंबेडकर मोठे नेते आहेत. त्यांच्याबाबत आमच्या मनात आदर आहे. मात्र त्यांचा जो पक्ष आहे आणि त्यांचे जे उमेदवार लोकसभा निवडणुकीत उभे राहिले त्यांनी जी मत खाल्ली ती मतं त्यांनी भाजपाची नाही तर भाजपाच्या विरोधातील उमेदवारांची मते खाल्ली आहेत.प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून मदत भाजपालाच होणार असेल प्रकाश आंबेडकर यांनी ठाम भूमिका घेण्याची गरज आहे असे रोहित पवार म्हणाले.