Sanjay Raut : फडणवीस यांचा अटकेचा नुसताच कांगावा; संजय राऊतांनी सुनावले..
नाशिक – महाविकास आघाडी सरकारकडून (MVA) मला अटक होणार होती, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सातत्याने करत आहेत. पहाटेच्या शपथविधीवरूनही त्यांनी वक्तव्य केले आहे. हा फडणवीस यांचा नुसता कांगावा आहे. अटक झाल्यानंतर त्यांना प्रकाशझोतात यायचे होते. पण, त्यावेळचे मुख्यमंत्री सभ्य आणि सुसंस्कृत होते, असे शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सुनावले. राऊत नाशिकमध्ये (Nashik) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, की कालच देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीचा प्रश्न उपस्थित केला. आज येथे उपस्थित आमदार दिलीप बनकर (Dilip Bankar) त्या शपथविधीचे साक्षीदार आहेत. २९०२४ मध्ये संपूर्ण नाशिक काय राज्य ताब्यात घेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. झाडावरची काही पाने गळून जातात नाशिकमध्ये सुद्धा काही नासकी पाने गळून गेली आहेत. शिवसेनेवर संकटे येत आहेत. शिवसेना संपून जावी, नष्ट व्हावी यासाठी दिल्लीपासून काटकारस्थान चालू आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
माणसे फोडण्यासाठी एजंट नेमली आहेत. किंमत ठरवली जात आहे.तिथून दहा लाख आणायचे आणि यांच्या हातावर सव्वा लाख ठेवायचे, असे मुर्दाड शिवसेनेबरोबर काय लढा देणार ? असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.
नाशिकमध्येही भगवाच फडकणार
नाशिकात शिवसेनेचे पहिले महाअधिवेशन झाले त्यावेळेस राज्यात पहिले शिवसेनेची सत्ता आली.नाशिकची शिवसेना मजबुतीने उभी आहे आणि यापुढेही राहील. शिवसेनेच्या स्थापनेनंतर देशात २८० सेना निर्माण झाल्या पण दोनच सेना शिल्लक राहिल्या एक भारतीय सेना आणि दुसरी शिवसेना असेही ते म्हणाले. बाळासाहेबांच्या शिवसेनेचा पराभव कुणीही करू शकणार नाही. प्रधानमंत्री स्वतः मुंबईला (Mumbai) येतात. मुंबई दिल्ली अपडाऊन करत आहेत. मुंबई महापालिका (Mumbai Muncipal Corporation) जिंकण्यासाठी कितीही प्रयत्न करा पण मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल नाशिक आणि ठाण्यात सुद्धा तसेच घडेल.