मुंडे-ढाकणे सत्तासंघर्ष; मोनिका राजळेंसाठी मुंडे भगिनींची ताकद
Shevgaon Pathardi Constituency Elections : ऊसतोड मजुरांचे नेते असलेल्या माजी केंद्रीय मंत्री स्व. बबनराव ढाकणे (Babanrao Dhakane) व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्यात राजकीय संघर्ष होता. या दोन्ही नेत्यांच्या निधनानंतर काही वर्षे उलटूनही या दोन्ही नेत्यांच्या कुटुंबातील दुसऱ्या पिढीतही आज हा राजकीय संघर्ष पहायला मिळतोय. हाच राजकीय सत्तासंघर्ष राजळे व ढाकणे कुटुंबातही पहायला मिळत आहे. या राजकीय संघर्षाचे मैदान ठरत आहे शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघ.
बबनराव ढाकणे व गोपीनाथ मुंडे हे दोघेही ऊसतोड मजुरांचे मोठे नेते. अहिल्यानगर जिल्ह्यातील भगवान गडावर दोन्ही नेत्यांची तुफानी भाषणे व्हायची. मात्र, याच भगवान गडावरील सभा व ऊसतोड मजुरांच्या नेतृत्वावरून या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला. हा राजकीय संघर्ष आजतागायत सुरू आहे. तसं पाहिलं तर या दोन्ही घराण्यांतील राजकीय संघर्ष 50 वर्षे जुना आहे.
2019 मधील विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहिला तर या निवडणुकीत प्रताप ढाकणे यांना घुले यांनी साथ दिली. तरीही मोनिका राजळे यांचा पुन्हा विजय झाला होता. आता घुले यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष लढण्याचे ठरवले आहे. ढाकणे यांनी शरद पवार गटाकडे जाऊन उमेदवारी मिळवली. भाजपने पुन्हा एकदा आमदार मोनिका राजळे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, या मतदारसंघांमध्ये राजळे कुटुंबाने सहकाराच्या माध्यमातून सर्व घटकांना सहकारात पदे देऊन सर्व समावेशक राजकारण केलं. हेच सर्वसमावेशक राजकारण त्यांचं बलस्थान ठरत आहे.
एकदा भगवान गडावरील सभेतून तरुणांनी स्व. बबनराव ढाकणे यांना विरोध केला व गोपीनाथ मुंडे यांना पुढे केले. तेव्हापासून गोपीनाथ मुंडेंनी भगवान गडावरील दसरा मेळावा गाजवण्यास सुरूवात केली. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे या ऊसतोड मजुरांच्या नेत्या झाल्या. ऊसतोड मजुरांचे प्रश्न त्यांनी सोडवण्यासाठी प्रयत्न केले. राज्यात त्या मंत्री होत्या. बबनराव ढाकणे यांचे पुत्र प्रताप ढाकणे यांनीही राजकारणात प्रवेश करत काही काळ भाजप नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अशी पक्षांतरे केली.
विरोधकांच्या खोट्या प्रचाराला नागरिक थारा देणार नाही, आमदार मोनिका राजळेंचा विरोधकांवर घणाघात
केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक स्व. गोपीनाथ मुंडे व स्व. राजीव राजळे यांनी एकत्र येऊन लढवली होती. त्यावेळी ढाकणे हे सत्ताधारी पक्षात होते. तेव्हा त्यांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप झाला होता. तेव्हा गोपीनाथ मुंडेंवरील लाठीचार्ज राजीव राजळे यांनी स्वतःच्या अंगावर घेतला होता. या पट्ट्यात पंकजा मुंडे यांचे राजकीय वजन आहे. मुंडेंनी २०१४ मध्ये मोनिका राजळे यांना भाजपचे तिकीट मिळवून दिले. या निवडणुकीत राजळे विजयी झाल्या. मोनिका राजळे या पंकजा मुंडे मोठ्या समर्थक समजल्या जातात. मोनिका राजळे यांचे वडीलही आमदार होते. त्यांचे गोपीनाथ मुंडे यांच्याशी मित्रत्वाचे संबंध होते.
मोनिका राजळे यांचे सासर-माहेरचे कुटुंब व मुंडे कुटुंबाचे स्नेह लक्षात ठेवत पंकजा मुंडे यांनी मोनिका राजळेंना नेहमीच पाठिंबा दिला. मोनिका राजळे यांना ढाकणेंविरोधात राजकीय ताकद दिली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रताप ढाकणे यांना मोनिका राजळेंच्या विरोधात उमेदवारी दिली होती. पंकजा मुंडे यांनी राजळेंसाठी प्रचारसभांचा धडाका लावला. या निवडणुकीतही राजळे विजयी झाल्या. यंदाच्याही विधानसभा निवडणुकीत मुंडे-ढाकणे संघर्ष पहायला मिळत आहे. मोनिका राजळे यांच्यासाठी पंकजा मुंडे प्रचारसभा घेत आहेत. तर राजळेंसमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रताप ढाकणे यांचे आव्हान उभे आहे. या राजकीय सत्तासंघर्षात कोण बाजी मारणार हे २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.
मोनिका राजळे यांनी सर्वात प्रथम जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली, त्यावेळी त्यांनी राजळे कुटुंबाचा पारंपरिक गट सोडून दुसऱ्या गटातून उमेदवारी केली. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. पुढे त्या जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष झाल्या. या कालावधीत त्यांनी मतदारसंघात मोठे काम केले. त्यानंतर भाजपने त्यांना २०१४ व २०१९ मध्येही विधानसभेची उमेदवारी दिली. या निवडणुकांत त्यांनी विजय मिळवला. मोनिका राजळे यांनी प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवला आहे. तर प्रताप ढाकणे यांना प्रत्येक निवडणुकीत पराभव पहावा लागला आहे.
पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी मोनिका राजळेंना विधानसभेत पाठवा, नरेंद्र पाटलांचे आवाहन
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोनिका राजळे यांच्या विरोधात प्रताप ढाकणे यांच्यासह माजी आमदार चंद्रशेखर घुले, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य हर्षदा काकडे यांच्यासह १४ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वांकडून मोनिका राजळे यांच्या विरोधात भाषणे व आरोप सुरू आहेत. मात्र, राजळे या आरोपांना उत्तर देण्यापेक्षा मतदारसंघातील नागरिकांची कामे करण्याला विश्वास देणार असल्याचे सांगत आहेत. या राजकीय सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागणार आहे. मोनिका राजळेंना मताधिक्य मिळविण्यासाठी पंकजा मुंडे-प्रितम मुंडे दोघा बहिणींचा प्रयत्न आहे.