नगर अर्बन बँक घोटाळा आरोपींच्या मालमत्ता जप्तीचा निर्णय; ठेवीदारांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा

आरोपींकडून मालमत्ता विक्री करून सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी शासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

News Photo   2026 03 31T203922.348

नगर अर्बन बँक घोटाळ्यातील (Nagar) आरोपी चेअरमन, संचालक, वरिष्ठ अधिकारी तसेच काही मोठ्या कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय हा ठेवीदारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व दिशादर्शक ठरला आहे. या निर्णयामुळे बँक बुडवणाऱ्या जबाबदार घटकांवर ठोस कारवाईची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे.

नगर अर्बन बँकेतील चेअरमन, संचालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संगनमताने भ्रष्ट कारभार करत बँकेचे अस्तित्व धोक्यात आणले. ठेवीदारांचा निधी धोक्यात घालून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार करण्यात आले. शासन व रिझर्व बँकेकडून वेळोवेळी सूचना देऊनही सुधारणा न करता भ्रष्टाचार सुरूच ठेवण्यात आला. विशेषतः 2014 नंतर मल्टीस्टेटच्या नावाखाली कायद्याचा गैरफायदा घेत भ्रष्टाचारात मोठी वाढ झाली.

बँक ग्राहकांसाठी अच्छे दिन; आता मोबाईल नंबरप्रमाणे बँक खाते करता येणार पोर्ट

या सर्व प्रकाराचा परिणाम म्हणून 2023 मध्ये बँकेचा परवाना रद्द झाला आणि ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले. सुमारे 114 वर्षांची परंपरा असलेल्या बँकेचा जवळपास 175 कोटी रुपयांचा निधी धोक्यात आला. 2017 पासून सभासदांना लाभांश मिळणे बंद झाले, तर अनेक कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ आली.

दरम्यान, बँक बचाव समितीने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत मोठ्या प्रमाणावर वसुली केली. आतापर्यंत ठेवीदारांना सुमारे 70 टक्के रक्कम परत मिळाली आहे. उर्वरित 30 टक्क्यांपैकी 15 टक्के रक्कम एप्रिल 2024 मध्ये देण्याची प्रक्रिया सुरू असून उर्वरित 15 टक्क्यांसाठीही लढा सुरू राहणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. देशभरात ठेवीदारांना एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम परत मिळवून देण्याचे हे एकमेव उदाहरण मानले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने 18 मार्च 2024 रोजी अधिसूचना काढून संबंधित आरोपी, संचालक, अधिकारी व काही कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. जप्त करण्यात येणाऱ्या मालमत्तांची एकूण किंमत कोट्यवधी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे. या कारवाईतून ठेवीदारांचे पैसे, व्याज, बँकेचा निधी, सभासदांचा लाभांश तसेच कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न होणार आहे.

तसेच, संबंधित आरोपींकडून मालमत्ता विक्री करून सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी शासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अधिसूचनेत संबंधित मालमत्तांची सविस्तर यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, बँक बचाव समितीच्या प्रयत्नांमुळे ठेवीदारांना न्याय मिळत असून, 114 वर्षांची परंपरा असलेली नगर अर्बन बँक पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पत्रकार परिषदेत राजेंद्र गांधी, राजेंद्र चोपडा, अ‍ॅड. अच्युत पिंगळे व डी. एम. कुलकर्णी यांनी दिली.

यामधील आरोपी सुरेश शिवराम सातपुते, केशव भाऊसाहेब काळे, विनोदकुमार अण्णासाहेब श्रीखंडे, अनिल चंदुलाल कोठारी, महादेव पंढरीनाथ साळवे, अजय अमृतलाल बोरा, रवींद्र विठ्ठल कडूस, सतीश विठ्ठल रोकडे, मनेष दशरथ साठे, गिरीश केदारनाथ लाहोटी, राजेंद्र केशवराव डोळे, नवनीत शांतीलाल सुपरिया, प्रगती देवेंद्र गांधी, सरोज दिलीप गांधी, शैलेश सुरेश मुनोत, दिनेश पोपटलाल कटारिया, अक्षय राजेंद्र लुनावत, केदार मुरलीधर लोहाटी, शिवदास दिलीप गायकवाड, शितल शिवदास गायकवाड, सचिन दिलीप गायकवाड, दीप्ती सुरेंद्र गांधी, देवेंद्र दिलीप गांधी, सुरेंद्र दिलीप गांधी, संदीप ईश्वरदार वाघमारे, रवींद्र विठ्ठल जेजुरकर, अशोकलाल माधवलाल कटारिया, राजेंद्र बहिरू म्हस्के, आशुतोष सतीश लांडगे या व्यक्तींची कुणीही कोणत्याही जमिनीचा व पैशाचा व्यवहार करू नये कारण जमिनी हे महाराष्ट्र शासनाकडून जप्त करण्यात येणार असल्याने व्यवहार करू नये असे बँक बचाओ समितीने सांगितले.

follow us