मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस; ओबीसी संघटना जरांगेंविरोधात आक्रमक

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest : मनोज जरांगे यांचं आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मराठवाडा तसंच राज्यातील इतरही (Jarange) भागातील मराठा मुंबईच्या दिशेने येत आहेत. असं असतानाच आता जरांगे यांच्या मागणीला विरोध करण्यासाठी ओबीसी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. नागपूर, जालना तसेच इतर भागात ओबीसी संघटना उपोषणाला बसल्या असून वातावरण तापण्याची शक्यता आहे.
जालना जिल्ह्यात ओबीसी बांधवांचे साखळी उपोषण चालू होणार आहे. येत्या 1 ऑगस्टपासून अंतरवाली सरटी येथेच या उपोषणाला सुरुवात होईल. या उपोषणासंदर्भात ओबीसी बांधवांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना साखळी उपोषणासंदर्भात निवेदन दिलं आहे. ओबीसीच्या आरक्षणातील घुसखोरी थांबली पाहिजे आणि शिंदे समिती रद्द करा या मागणीसाठी आता ओबीसी बांधव आक्रमक झाले असून ठिकठिकाणी साखळी उपोषण केलं जाणार आहे.
त्यासाठी तुम्हाला एक मिनिटाचाही वेळ देणार नाही; जरांगे पाटलांनी शिंदे समितीची ती मागणी फेटाळली
नागपूरमध्येही ओबीसी बांधवांकडून आंदोलन केलं जात आहे. जरांगे पाटील यांच्या मागणीला ओबीसींचा विरोध आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं येथे साखळी उपोषण चालू झालं आहे. या उपोषणाला नागपुरातील सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. या आंदोलनाला भाजप आणि काही काँग्रेस नेत्यांनीही पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे आम्ही भविष्यात मुंबईकडेही कूच करू, असा इसाराच या आंदोलनकांनी दिला आहे. साखळी उपोषणाचा आजचा पहिला दिवस होता.
दुसरीकडं ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके आणि मगेश ससाणे हेदेखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी जरांगे यांच्या मागणीला कडाडून विरोध केला आहे. मोज जरांगे हा कोण आहे. तो संविधानिक पदावर बसलेला आहे का? जरांगे मुख्यमंत्र्यांना शिव्या देतात. आमची चळवळ ही सरकारविरोधात आहे, असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाला ओबीसीत समील करण्यास विरोध दर्शवला. ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. या प्रकरणात आमदार, खासदार तसेच सर्व राजकीय पक्षांनी आपापली भूमिका जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
मंगेश ससाणे यांनीदेखील जरांगे यांची मागणी बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. जरांगे यांच्या बेकायदेशीर मागणीला बळी पडून सरकारने ओबीसींच्या विरोधात निर्णय घेऊ नये. त्यासाठी गरज पडलीच तर आम्ही संघर्ष करू. जरांगे यांनी संपूर्ण मुंबई जाम केली आहे. दहा ते पंधरा टक्के लोकांनी मुंबई जाम केली आहे, अशी टीका मंगेश ससाणे यांनी केली आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.