“बा विठ्ठला… सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती दे” : महापुजेवेळी फडणवीसांचे साकडे
पंढरपूर : बा विठ्ठला… राज्यातील सर्व जनतेला सुखी समाधानी ठेव. शेतकरी-कष्टकरी समाजासमोरील संकटे दूर कर, त्यांना समाधानी ठेव. समाजातील सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती आणि आशीर्वाद दे, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कार्तिकी एकादशीनिमित्तच्या शासकीय महापूजेसमयी श्री. विठ्ठलाच्या चरणी घातले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (On the occasion of Kartiki Ekadashi, the official mahapuja of Shri Vitthal-Rukmini was concluded by Deputy Chief Minister Devendra Fadnavis and his wife Amrita Fadnavis)
कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज (गुरुवार) पहाटे संपन्न झाली. त्यानंतर मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते फडणवीस दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कामगार मंत्री सुरेश खाडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
Bachchu Kadu : जवळच्याच माणसाने पंकजा मुंडेंचा घात केला; कडूंच्या वक्तव्याने खळबळ!
यावेळी फडणवीस म्हणाले, मागील वर्षी कार्तिकी एकादशीला विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिवार देवता संवर्धनाची संकल्पना मांडली होती. यावर्षी मंदिराच्या संवर्धनासाठी मंजूर आलेल्या 73 कोटींपैकी पहिल्या टप्प्यातील 26 कोटींच्या विविध संवर्धन विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले, त्याबद्दल समाधान वाटत आहे. मात्र हे काम अत्यंत वेगाने आणि उत्कृष्ट दर्जाचे होईल यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा आणि संबंधित ठेकेदार यांनी काळजी घेतली पाहिजे.
शिवाय दुसऱ्या टप्प्यातील कामांनाही लवकरच सुरुवात होणार आहे. परंतु, विकास आराखड्यातील सर्व कामे ही सर्वांना विश्वासात घेऊनच करण्यात येतील. कोणालाही विस्थापित व्हावे लागणार नाही किंवा कोणाचेही नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. चंद्रभागा नदी देखील अविरतपणे वाहत राहिली पाहिजे यासाठी नदी संवर्धनाच्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.
पनवती शब्दावर आक्षेप, राहुल गांधी, खर्गेंविरोधात EC मध्ये तक्रार, खासदारकी धोक्यात येणार?
नाशिकमधील दाम्पत्याला मिळाला मानाच्या वारकऱ्याचा सन्मान :
दरम्यान, यावेळी नाशिक जिल्ह्यातील घुगे दाम्पत्याला मानाच्या वारकऱ्याचा आणि शासकीय महापूजेचा मान मिळाला. शासकीय महापूजेच्या वेळी उपस्थित राहणाऱ्या मानाच्या वारकरी निवडीसाठी दर्शन रांगेतून माळकरी भाविकांची निवड करण्यात आली. त्यावेळी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला येथील शेतकरी बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे या दाम्पत्याची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आली. हे शेतकरी दाम्पत्य मागील पंधरा वर्षापासून नियमितपणे वारी करत आहे. यावेळी या दाम्पत्याला फडणवीस यांच्या हस्ते राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे वर्षभर मोफत एसटी प्रवासाचा पास देण्यात आला.