कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कधी न्याय मिळणार?, संघटनांचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते आक्रमक

Onion farmer : शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी द्यावी, एनसीसीएफद्वारे कांदा खरेदी कायमस्वरुपी बंद करताना काद्यांला उत्पादन खर्चावर भाव मिळावा, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत (farmer) असून त्याला न्याय द्या आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते नाशिकमध्ये आक्रमक झाले होते.
शेतकऱ्यांनी काल जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर कांदा-भाकरी खाऊन आंदोलन केले. तर निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांच्या दालनात ठिय्या मांडला. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे पोलास व महसूल यंत्रणेची धावपळ उडाली. कांदा उत्पादक शेतकरी संघर्ष समितीतर्फे आंदोलन करण्यात आले.यावेळी उन्हाळी कांद्याला मे महिन्यापासून उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत आहे.
पीक विमा योजनेत फारसं पीक हाती येत नाही; मुदतवाढ मिळूनही पीक विमा भरण्याकडं शेतकरी फिरकेना
या सगळ्या प्रकारामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरले आहे. बदलत्या हवामानामुळे चाळीत कांदा सडत असून कांदा विक्रीतून रास्तभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे या प्रश्नावर तात्काळ मार्ग काढावा, अशी मागणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केली. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी प्रथम जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर कांदा-भाकरी खात आंदोलन केले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी राजपूत यांच्या दालनाबाहेरही सोबत आणलेल्या कांदा-भाकरी खाऊन शासनाचा निषेध नोंदवला.
काही शेतकऱ्यांनी कार्यालयाच्या भिंतीवर कांदा फोडून रोष व्यक्त केला.
निवासी उपजिल्हाधिकारी राजपूत यांनी शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलविले.पण मुख्यमंत्र्यांशी संवाद झाल्याशिवाय माघार नाही, अशी भुमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने अधिकाऱ्यांपुढे पेच निर्माण झाला. आंदोलनाप्रसंगी दीपक पगार, भानुदास ढिकले, प्रवीण अहिरे, बाळासाहेब धुमाळ, बाळासाहेब चौधरी, सुभाष गवळी, शंकर ढिकले यांच्यासह अन्य कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.