फडणवीसांचा छत्तीसगड प्रचार दौरा वादात; महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडल्याचा विरोधकांचा आरोप

फडणवीसांचा छत्तीसगड प्रचार दौरा वादात; महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडल्याचा विरोधकांचा आरोप

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा छत्तीसगड (Chhattisgarh) प्रचार दौरा वादात सापडला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन तीव्र झाले आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीचे प्रकार घडले आहेत. नेत्यांच्या घरांना आणि वाहनांना आग लावली जात आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात येत आहे. त्याचवेळी फडणवीस छत्तीसगडमध्ये भाजपच्या प्रचाराला गेल्याने त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. (Opposition criticizes Chhattisgarh campaign tour of Deputy Chief Minister Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. लोकप्रतिनिधींवर हल्ले होत आहेत. त्यांची घरे जाळली जात आहेत. आरक्षणाच्या मागणीचे आंदोलन दिवसेंदिवस दिवस तीव्र होत आहे.‌याकाळात राज्याच्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रात ठाण मांडून बसणे आवश्यक आहे.परंतु हे महोदय छत्तीसगडमध्ये निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. यापुर्वी देखील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला तेंव्हा हे महाशय राज्यात उपलब्ध नव्हते.

Manoj Jarange : मोठी बातमी! CM शिंदेंचा मनोज जरांगेंना फोन; जरांगेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अगदी नागपूर पाण्यात बुडाले तेंव्हा देखील ते मुंबईत हायकमांडची सेवा करण्यात बिझी होते. त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा राज्यातील जनतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा उदासीन आणि आकसपूर्ण आहे हे यानिमित्ताने उघड झाले आहे. अडचणीच्या काळात महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या या निष्क्रिय गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने त्यांचा राजीनामा घेऊन मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही खासदार सुळे यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून केली आहे.

तर राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले, आज सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्र होरपळतोय. पण ही आग विझवण्याचं सोडून आपले गृहमंत्री छत्तीसगड भाजप राजकीय आगीत खाक होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून तिकडं जातात. कधी कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं, हे देवेंद्र फडणवीस साहेब आपल्यासारख्या नेत्याला नक्कीच कळत असणार. तरीही महाराष्ट्र जळताना तो शांत करण्याऐवजी तुम्ही इतर राज्यात जाऊच कसं शकतात? एकीकडे मनोज जरांगे पाटील शांततेचं आवाहन करत आहेत. पण गृहमंत्री असूनही महाराष्ट्र जळत असताना तुम्ही इतर राज्यात निघून जाता. याचा अर्थ या जाळपोळीच्या घटनांची तुम्ही अप्रत्यक्षरीत्या पाठराखण करता, असं आम्ही समजायचं का? असा आरोपही त्यांनी केला.

Maratha Reservation : जामखेड, राहुरी, श्रीगोंद्यात बंदची हाक; पाथर्डीत मोटारसायकल रॅली

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, भीमा कोरेगाव दंगलीवेळी राज्य पेटले असताना फडणवीस हातावर हात ठेऊन बसले होते. ते राज्य पेटताना बघत राहिले. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेही सध्या राज्य पेटताना पाहत आहेत. राज्यात इतकी चिंताजनक परिस्थिती असताना आणि महत्त्वाच्या घडामोडी सुरु असताना फडणवीस रायपूरला प्रचाराला कसे जाऊ शकतात? त्यांच्यात एवढा निगरगट्टपणा कुठून आला? असा सवालही त्यांनी केला.

फडणवीस छत्तीसगडमध्ये प्रचार दौऱ्याला :

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल (30 ऑक्टोबर) भाजपच्या प्रचारासाठी छत्तीसगड दौऱ्यावर गेले होते. तिथून ते काल दिवसभर प्रचार दौरा करुन रात्री मुंबईमध्ये परतले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात वर्षा बंगल्यावर आढावा बैठक पार पडली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेटली आणि त्यांना राज्यातील परिस्थितीची कल्पना दिली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube