लाचखोर तहसीलदार व्यंकटेश मुंडेला ठोकल्या बेड्या, एसीबीची थेट कारवाई
तक्रारदारास सालन्सी प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
मंत्रालयातील अधिकाऱ्याने लाच घेतल्याचं प्रकरण गाजत असतानाच आता बीड (Beed) जिल्ह्यातील परळी येथून एक बातमी समोर आली आहे. येथील तहसीलदारच लाच घेताना जाळ्यात अडकला आहे. व्यंकटेश मुंडे असं या तहसीलदाराचं नाव आहे.
तक्रारदारास सालन्सी प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती वीस हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. एसीबीने रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला होता. मात्र, तक्रारदाराच्या हालचालीवर संशय आल्याने तहसीलदार मुंडे यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचं सांगितलं.
बीडच्या आष्टीत दोघांकडं आढळले इंग्लिश बनावटीचे पिस्तूल, पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
यानंतरही एसीबीने आवश्यक ते सर्व पुरावे संकलित करून व्यंकटेश मुंडे यांना ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, एसीबीच्या या कारवाईमुळे महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. तर गेल्या काही दिवसांत एसीबीच्या वाढत्या छाप्यांमुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
राज्यात गाजलेलं प्रकरण
मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयात लाच घेण्यासाठी कथित ‘सिक्रेट कोडवर्ड’ वापरला जात असल्याचा आरोप समोर आला आहे. स्टिंग ऑपरेशनमध्ये फाईलवर पेनाने एक लाईन मारणे म्हणजे 50 हजार रुपये, तर दोन लाईन म्हणजे 1 लाख रुपये अशी खूण वापरली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात डॉ. गाडे यांचे नाव समोर आले आहे. मेडिकल दुकानदार निर्मल शर्मा यांनी केलेल्या स्टिंगनुसार, औषधांच्या फ्रीजमध्ये पाण्याच्या बाटल्या व ओआरएस ठेवल्यामुळे त्यांचा परवाना एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आला होता. त्याविरोधात त्यांनी 7 फेब्रुवारी रोजी मंत्रालयात अपील दाखल केले. 13 फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली.
