CM शिंदे विधानसभेसाठी सज्ज! 46 प्रभारी अन् 93 निरीक्षकांच्या नियुक्त्या; जागांचंही टार्गेट
Eknath Shinde : राज्यातील राजकीय पक्षांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला (Maharashtra Elections) सुरुवात केली आहे. सध्याची परिस्थिती पाहिली तर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातच लढत होईल अशी शक्यता आहे. या दोन्ही आघाड्यांनी तशीच तयारीही सुरू केली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चा लवकरच सुरू होतील. दुसरीकडे महायुतीतील घटक पक्षही सज्ज झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सक्रिय झाले आहेत. जागावाटपाची चर्चा प्राथमिक टप्प्यात आहे. आगामी निवडणुकीत शिंदे गट शंभर जागांवर उमेदवार देईल अशी चर्चा आहे. या निवडणुकीची तयारी म्हणून शिवसेनेने राज्यातील 113 विधानसभा मतदारसंघात 46 विधानसभा प्रभारी आणि 93 मतदारसंघांत विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आणखी दोन महिने शिल्लक असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. अशा वेळी कोणतीही कमतरता राहू नये याची काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घेतली जात आहे.
एकनाथ शिंदेंनी वाढवलं अजितदादांचं टेन्शन.. 110 जागांवर सुरु केली विधानसभेची तयारी
विधानसभा निवडणुकीत महायुतीत कोण किती जागा लढवणार याबाबत अजून काहीच निश्चित नाही. तरीदेखील एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आपला आकडा निश्चित केल्याचं दिसत आहे. शिंदे गटाकडून 100 ते 110 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 80 ते 90 जागांची मागणी केली जाऊ शकते. जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचं नियोजन या दोन्ही पक्षांनी केलं आहे. तर दुसरीकडे भाजपनेही 155 ते 160 जागा लढवण्याचं निश्चित केलं आहे. 155 पेक्षा कमी जागा कोणत्याही परिस्थितीत घ्यायच्या नाहीत असा मेसेज राज्यातील भाजप नेत्यांनी वरिष्ठांना दिल्याची माहिती आहे.
शिंदेंचे मुंबईवर सर्वाधिक लक्ष
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं निवडणुकीचे प्लॅनिंग सुरू केले आहे. शिंदे यांनी मुंबईतील 36 पैकी 18 जागांसाठी निवडणूक प्रभारींची नियुक्ती केली आहे. यामध्ये माजी नगरसेवक कमलेश राय (चांदिवली, कलिना), मिलींद देवरा (वरळी, शिवडी), यशवंत जाधव (भायखळा), रवींद्र वायकर (जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, परभणी, गंगाखेड), राहुल शेवाळे (चेंबूर, अणुशक्ती नगर, माहीम, धारावी), शिशिर शिंदे (भांडूप पश्चिम, कुर्ला, विक्रोळी, मानखुर्द) यांचा समावेश आहे. काँग्रेसचा राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केलेल्या संजय निरुपम यांना अंधेरी पूर्व, मालाड पश्चिम, मागाठाणे या भागांची जबाबदारी देण्यात आली आहे.
लाडकी बहिण योजना विरोधकांना पचलेली नाही, ते लाडक्या बहिणीचे सावत्र भाऊ, CM शिंदेंचा टोला