पॉलिटेक्निक डिप्लोमा प्रवेशाला मुदतवाढ, 4 सप्टेंबरपर्यंत घेता येईल प्रवेश; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Polytechnic Course Admission : राज्यातील पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांसाठी (Polytecnic Admission) यावर्षी विद्यार्थ्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी आतापर्यंत 1 लाख 3 हजार 115 विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. ही मागील दहा वर्षांतील सर्वोच्च आकडेवारी आहे. प्रवेशाची टक्केवारी तब्बल 93 टक्क्यांवर पोहोचली आहे. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहून प्रवेशाची अंतिम मुदत 14 ऑगस्टवरून 4 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे आणि प्रवेश वाढीसाठी केलेल्या उपाययोजनांमुळे पॉलीटेक्निक प्रवेशात मागील दहा वर्षांतील विक्रम झाला आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या वेळापत्रकानुसार 14 ऑगस्ट प्रवेशासाठी अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, दहावी पुरवणी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी मिळावी, तसेच सणासुदीच्या सुट्ट्यांचा विचार करून 4 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. हीच अंतिम तारीख थेट द्वितीय वर्ष प्रवेश आणि बारावीनंतरच्या एचएमसीटी व सरफेस कोटिंग पदविका अभ्यासक्रमांसाठी लागू असेल.
दहावीनंतरचे पदविका अभ्यासक्रम हे विद्यार्थ्यांसाठी रोजगार व उच्च शिक्षणाचा उत्तम पर्याय ठरत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा सायन्स, रोबोटिक्स यांसारखे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती मोहिमा, उद्योग क्षेत्राशी सामंजस्य करार आणि स्वयंअध्ययन मूल्यांकन यांसारख्या उपक्रमांमुळे हा विक्रमी प्रतिसाद मिळत आहे.
रोजगाराच्या हमखास संधी
दहावीचा निकाल जाहीर होताच तंत्रशिक्षण संचालनालयाने पॉलिटेक्निक प्रवेशाचे वेळापत्रक वेबसाइटवर जाहीर केले होते. दहावीनंतर कमी कालावधीत तंत्रशिक्षण घेऊन अभियंता होण्यासाठी तंत्रशिक्षणातील पदविका अभ्यासक्रम हा एक उत्तम पर्याय आहे. हा पदविका अभ्यासक्रम दहावीनंतर तीन वर्षांचा असतो. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतात. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना पात्रतेच्या निकषानुसार विविध शिष्यवृत्ती शासनातर्फे देण्यात येते. पदविका शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षात पात्रतेनुसार प्रवेश घेण्याची संधीही उपलब्ध असते.