मोठी बातमी! राज्यातील 70 आयटीआयमध्ये सुरू होणार नवीन अभ्यासक्रम; मंत्री लोढा यांची माहिती

Maharashtra News : केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालक यांनी राज्यातील 70 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास (Maharashtra News) मान्यता दिली आहे. तसेच चेंबूर येथे शासकीय उच्चस्तरीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापनेसाठी मान्यता देण्यात आली आहे. काळानुरूप बदलत्या अभ्यासक्रमामुळे रोजगाराच्या संधीमध्ये वाढ होवून यामुळे महाराष्ट्रातील आयटीआयमध्ये क्रांती घडणार आहे, अशी माहिती कौशल्य,रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
महाराष्ट्रातील 70 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिक), ईव्ही मेकॅनिक (इलेक्ट्रिक व्हेईकल) हे नवीन अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहेत. पर्यावरण संवर्धनावर आधारित योजना राबविण्यार राज्य शासनाचा भर आहे. राज्यात सौर ऊर्जेशी निगडीत तंत्रज्ञानांची व सोलर टेक्निशियन तसेच मेकॅनिक इलेक्ट्रिक व्हेईकलची गरज लक्षात घेवून या क्षेत्रातील टेक्निशियन मागणी वाढणार आहे. त्यानुषंगाने दोन नवीन अभ्यासक्रमांची मागणी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाने केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालक यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या (Devendra Fadnavis) मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास विभाग नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर आणि मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या सूचना व सल्ल्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये काळानुरूप अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. सध्या राज्यातील 70 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहे. ज्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रमांची मागणी करतील त्यांना मंजूरी देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री लोढा यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, EPFO मध्ये मोठा बदल, नॉमिनीला मिळणार 50,000 रुपये
चेंबूर येथे शासकीय उच्चस्तरीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापनेसाठी मान्यता देण्यात आली आहे. या संस्थेत सन 2025-26 साठी रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनिंग टेक्निशीयन, इलेक्ट्रिशियन, वायरमन, आयओटी टेक्निशियन (स्मार्ट सिटी), इलेक्ट्रीक मेकॅनिक हे अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना काळानुरूप शिक्षण देवून जास्तीत जास्त कुशल मनुष्यबळ तयार करणे हा कौशल्य विकास विभागाचा उद्देश आहे. आयटीआय हा एक उच्च कौशल्य गुणवत्ता ब्रँड म्हणून प्रस्थापित करण्यासाठी खाजगी औद्योगिक आस्थापनांच्या सहाय्याने राज्यातील 36 जिल्हास्तरीय आद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये दर्जावाढ करण्यात येत आहे. औद्योगिक आस्थापनाच्या मदतीने प्रशिक्षण व प्रशिक्षण सुविधा वृध्दींगत करणे, राज्यात दरवर्षी अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने कौशल्य अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत.
आयटीआय मध्ये नवीन कौशल्य आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर देण्यात येत आहे. उद्योग जगताला आवश्यक असे अधिक मागणीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. तंत्रप्रदर्शन व युवा शक्ती करिअर मार्गदर्शन शिबीरांच्या माध्यमातून अधिक कुशल मनुष्यबळ निर्माण करून रोजगाराच्या संधी अधिकाधिक निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे, असे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
कमाईत Swiggy, Zomato डिलिव्हरी बॉईज पुढे; आयटी कंपन्यांच्या फ्रेशर्सपेक्षा जास्त पगार