Rain Alert : मुंबई, पुणे, कोकणात आज मेघगर्जनेसह पावसाची ‘मुसळ’धार…
मुंबई, पुणे, ठाणे कोकणासह 30 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला असून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलायं.
Maharashtra Rain Alert : केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आता मान्सूनचा महाराष्ट्रात (Maharashtra Rain) प्रवेश झाला असून राज्यातील 30 जिल्ह्यांत आज मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलायं. यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे कोकणात पावसाचा जोर चांगलाच राहणार असल्याचाही अंदाज आहे. त्यामुळे आता बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.
दोन दिवसांपूर्वीच हवामान विभागाने पुढील 48 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज सांगितला होता. यामध्ये विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुणे जिल्ह्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून तीव्र उष्णतेच्या झळा सहन करणाऱ्या विदर्भालाही मान्सूनपूर्व पावसाचा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. अकोला जिल्ह्यासाठी हवामान विभागाने पुढील चार दिवस यलो अलर्ट जारी केला असून 6 ते 9 जून दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो.
मंजुळाच्या झपाट्यात अडकला केशव? ‘तुंबाडची मंजुळा’ मधील ओमच्या भूमिकेचं होतंय कौतुक
दरम्यान, राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी त्याला आणखी काही दिवस लागणार आहेत. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 15 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यभर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून प्रशासन आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मान्सूनच्या आगमनाने एकीकडे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, तर दुसरीकडे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
पुणे, सातारा आणि कोल्हापूर परिसरात मान्सून सक्रिय झाला असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पावसाची शक्यता आहे. 12 ते 18 जूनदरम्यान मान्सून मराठवाड्यात दाखल होऊन संपूर्ण विभागात पोहोचण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे.