उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसाठी बारामतीत सांगता सभा, महायुतीच्या मंचावर सुप्रिया सुळे भावूक
Supriya Sule On Sunetra Pawar : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती पोटनिवडणुकीसाठी आज महायुतीकडून सांगता सभा आयोजित करण्यात आली आहे.
Supriya Sule On Sunetra Pawar : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती पोटनिवडणुकीसाठी आज महायुतीकडून सांगता सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत महाविकास आघाडीकडून बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील हजेरी लावली. या सभेत भाषणावेळी सुप्रिया सुळे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
या सभेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की, महाराष्ट्रातून आलेल्या सर्व दादाप्रेमींचे धन्यवाद. घरातला कर्ता पुरुष आपल्यात नाही हे दु:ख मनात आहे. गेले दोन – अडीच महिने सर्वांसाठीच अडचणीचे होते. अजितदादा आपल्यात नाहीत यावर विश्वास बसणं कठीण आहे. सुनेत्रा वहिनींना (Sunetra Pawar) मी महाविकास आघाडीकडून (MVA) शब्द देते की, महाविकास आघाडीचा कार्यकर्ता सुनेत्रा वहिनींसोबत ताकदीनं उभा राहिलं.
अजितदादांनी बारामतीची एक वेगळी ओळख राज्याच्या राजकारणात स्थापन केली आहे. अजितदादांनी 35 वर्षे बारामतीची सेवा केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत विक्रमी मतदान होणार याबद्दल शंका नाही. याच बारामतीकरांनी 6 दशके पवार साहेबांना निवडून आणलं आहे.
माझी इच्छा होती ही निवडणूक बिनविरोध व्हावी. जेव्हा निवडणुकीची घोषणा झाली तेव्हाच आम्ही सुनेत्रा पवारांना पाठींबा देत ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली होती असं या सभेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा – शरद पवार
मी १९६७ मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील माझ्या मतदानाचा हक्क अखंडपणे बजावला. आता २०२६ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे एक लाडके व लोकप्रिय नेते स्व. अजित पवार यांच्या दुर्दैवी, अपघाती निधनाच्या शोकात्म पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणुक होत आहे.
या पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचे मी ठरवले होते. दुर्दैवाने माझी प्रकृती बिघडल्याने मला मुंबईत रुग्णालयात दाखल व्हावे लागले. डॉक्टरांनी मला उपचार आणि सक्तीची विश्रांती या कारणास्तव मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे अत्यंत नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावण्यापासून मला वंचित रहावे लागत आहे, हे मी अत्यंत व्यथित आणि खेदपूर्ण अंत:करणाने सांगू इच्छितो. माझ्यावर अथक प्रेम व विश्वास असलेले बारामतीचे नागरिक, मतदार व कार्यकर्ते मला समजुन घेतील याची मी खात्री बाळगतो.
आमच्या पक्षाने (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार) या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा जाहिर केला आहे. स्व. अजित पवार यांना ही एकप्रकारे आमच्या पक्षातर्फे श्रद्धांजलीच आहे. माझे बारामतीमधील सर्व मतदारांना आवाहन आहे की, त्यांनी श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी. बारामतीमधील मतदार यांनी माझ्यावर प्रदीर्घ विश्वास ठेवलेला आहे. ते या आवाहनास प्रतिसाद देतील, असा मला विश्वास आहे.
मतदानासाठी प्रत्यक्ष न येता निवडणुक आयोगाच्या विविध पर्यायांचा देखील मी तपास केला व विचारणा केली. परंतु ते पर्याय उपलब्ध नसल्याचे राज्याच्या निवडणुक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अखेर अतिशय व्यथित व जड अंत:करणाने मला मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय करावा लागला. या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करावे, असे आवाहन शरद पवार यांनी एक्सवर बारामतीकरांना केले.
बारामती पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात या निवडणुकीत काँग्रेसकडून देखील उमेदवार जाहीर करण्यात आला होता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्या विनंतीनंतर काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.