पाच दिवसांनंतर अखेर रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन मागे; चार ते पाच दिवसांत सरकारसोबत चर्चेतून मार्ग निघणार
Ravikant Tupkar यांनी गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
Ravikant Tupkar finally end hunger strike solution expected to emerge through discussions with government : बुलढाणा येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या वतीने झालेल्या चर्चेनंतर आणि मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासने मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
…तर मी शिवसेनेचं पक्षप्रमुखपद सोडायला तयार; वर्धापनदिनीच उद्धव ठाकरेंचं मोठ विधान
राज्याचे वरिष्ठ मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन तुपकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेदरम्यान शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सरकार गंभीरपणे विचार करेल, तसेच लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक आयोजित केली जाईल, अशी हमी देण्यात आली. महाजन यांनी सांगितले की, पुढील काही दिवसांत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी विभागाचे मंत्री, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित विभागांचे सचिव यांच्यासोबत मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सखोल चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल.
दरम्यान, शेतकऱ्यांना सरसकट आणि विनाशर्त कर्जमाफी देण्याच्या प्रमुख मागणीसाठी तुपकर यांनी 15 जूनपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. आंदोलनादरम्यान त्यांनी अन्न ग्रहण केले नसल्याने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला होता. शरीरातील साखरेची पातळी घटणे, अशक्तपणा, चक्कर येणे आणि डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसून येत होती. वैद्यकीय तज्ज्ञांनीही त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली होती.
सरकारकडून मिळालेल्या आश्वासनांनंतर तुपकर यांनी ज्यूस घेऊन आंदोलन स्थगित केले. या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी आणि समर्थकांमध्ये दिलास्याचे वातावरण निर्माण झाले आहे.आता सर्वांचे लक्ष मुंबईत होणाऱ्या बैठकीकडे लागले असून, शेतकरी प्रश्नांवर सरकार कोणता निर्णय घेते याकडे राज्यभरातील शेतकरी वर्गाचे लक्ष आहे.