मदत करता येत नसेल तर शेतकऱ्यांची थट्टा करु नका, रोहित पवार मंत्री गिरीश महाजनवर भडकले
Rohit Pawar On Girish Mahajan : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने अनेक भागात सध्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात

Rohit Pawar On Girish Mahajan : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने अनेक भागात सध्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे. तर दुसरीकडे अनेक मंत्री आणि नेते पूरग्रस्त भागात दौरा करताना दिसत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील बेलगाव (पिंपळगाव) येथे भेट दिली होती. मात्र या गावात रस्ता खचला म्हणून गिरीश महाजन पाहणी न करताच परतले असा आरोप शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यांनी याबाबत एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट करत गिरीश महाजनसह राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मदत करता येत नसेल तर किमान शेतकऱ्यांची थट्टा तरी करू नका इतकंच या सरकारला आणि बिनकामी मंत्र्यांना सांगणं आहे. उगाच पर्यटन करायला आल्यासारखं यायचं आणि आपल्या आलीशान गाड्या बांधावर जात नाहीत म्हणून माघारी फिरायचं हे धंदे मंत्र्यांनी करू नयेत. स्वत:ला मोठे संकटमोचक म्हणवणारे महाजन साहेब बेलगाव (पिंपळगाव) इथं फक्त रस्ता खचला म्हणून पाहणी न करताच परतले याहून मोठं दुर्देव ते काय? जिथून महाजन साहेब माघारी फिरले तिथेच हाकेच्या अंतरावर विश्वनाथ दातखिळे यांच्या गोठ्यातील 35-40 जनावरं दगावून गोठा उद्ध्वस्त झाला..
दातखिळे कुटुंबावरील संकटाचं भान तरी मंत्री महाजन साहेब यांनी ठेवायला हवं होतं. सरकारने केवळ दिखाव्यासाठी मंत्र्यांचे दौरे काढून खर्च वाढवण्यापेक्षा #ओला_दुष्काळ जाहीर करून सरसकट हेक्टरी 50 हजारांची मदत करावी आणि कर्जमाफीचाही निर्णय घेऊन संकटातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, ही विनंती…! असं रोहित पवार यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मदत करता येत नसेल तर किमान शेतकऱ्यांची थट्टा तरी करू नका इतकंच या सरकारला आणि बिनकामी मंत्र्यांना सांगणं आहे. उगाच पर्यटन करायला आल्यासारखं यायचं आणि आपल्या आलीशान गाड्या बांधावर जात नाहीत म्हणून माघारी फिरायचं हे धंदे मंत्र्यांनी करू नयेत.
स्वत:ला मोठे संकटमोचक म्हणवणारे महाजन… pic.twitter.com/x5Plt23mO7
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 23, 2025
केंद्राकडे प्रस्ताव, पण राज्य मागे हटणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात येईल. पण राज्याने तातडीने मदत देणे प्रारंभ केले आहे. केंद्राची मदत मिळेलच, पण शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. काही भागांत अजूनही पाणी ओसरलेले नसल्याने स्थलांतरित नागरिकांना घरी परतता येत नाही. त्यांच्यासाठी सर्व व्यवस्था सरकार पुरवत आहे. सर्व पालकमंत्र्यांना पूरग्रस्त भागांना भेटी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अतिवृष्टीचा इशारा, प्रशासन सज्ज
हवामान खात्याने 27-28 सप्टेंबरदरम्यान पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, नागरिक आणि शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन सरकारने केले आहे. पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न अखंडपणे सुरू असून, शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.