Maratha Reservation : जरांगेंच्या मागणीला संभाजीराजेंचा ‘खो’; शासनाला दिला सबुरीचा सल्ला
पुणे : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी करत आहेत, पण ते न्यायालयात टिकत असेल तरच तुम्ही त्याचा विचार करावा, असा सबुरीचा सल्ला स्वराज्य संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य शासनाला दिला आहे. ते पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. (Sambhaji Raje Chhatrapati has advised the government to give Kunbi certificate to the Maratha community only if it survives in court)
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, आज अजित पवार यांची भेट झाली. यात मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाली. गरीब मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत असे दादांनी सांगितले. मनोज जरांगे हे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी करत आहेत, पण ते न्यायालयात बसत असेल तरच तुम्ही त्याचा विचार करावा असे मी दादांना सांगितले. कारण मागच्यावेळी यावरून मराठा समाजातील 49 लोकांनी आत्महत्या केल्या होत्या, तसे काही घडू नये याची खबरदरी घ्यावी.
मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवरील टोलनाक्यांवर आता ‘ठाकरें’चा वॉच; मनसेचे कॅमेरे ठेवणार लक्ष
मनोज जरांगे यांच्या मागणीचा समितीने अभ्यास करून विचार करावा, न्यायालयात टिकणारे आरक्षण याबाबत विचार व्हावा. कारण पहिल्यांदा सामाजिक मागास सिद्ध होणे गरजेचे आहे. सामाजिक मागास सिद्ध झाल्यानंतर आरक्षण मिळू शकते. शिंदे समिती स्थापन झाली, शिंदे समिती जो अहवाल देईल तो महत्त्वाचा आहे. त्यावर सरकारने आपली दिशा ठरवावी, असेही संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
जुना शिरस्ता कायम ठेवत अजितदादा अॅक्शन मोडमध्ये; ‘पालकमंत्री’ तब्बल 8 तास घेणार झाडाझडती
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करून चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्या (14 ऑक्टोबर) त्यांची आंतरवाली सराटी येथे विराट जाहीर सभा होत आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. मराठा समाजाला संपूर्ण राज्यात सरसकट ओबीसी आरक्षण मिळावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. यासाठी त्यांनी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला आहे. ही 40 दिवसांची मुदत उद्या (14 ऑक्टोबर) संपत आहे. कोणत्याही परिस्थितीत आता आरक्षण घेतल्याशिवाय सरकारची सुट्टी नाही, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.