ATS च्या हाती TCS प्रकरण; फरार HR चा शोध सुरू, दिल्ली स्फोटातील आरोपीशी लिंक?
मुख्य संशयितांपैकी एक असलेल्या एचआर मॅनेजरचा संभाव्य दहशतवादी कनेक्शन उघड झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Search underway for absconding HR : नाशिकमध्ये इंटरनॅशनल आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS मध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणासह कथित धर्मांतरणाच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून तपासाचा व्याप आता अधिक वाढला आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत असताना, मुख्य संशयितांपैकी एक असलेल्या एचआर मॅनेजरचा संभाव्य दहशतवादी कनेक्शन उघड झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील TCS कार्यालयात काही महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक अत्याचार तसेच जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचे आरोप पुढे आले होते. याप्रकरणी आतापर्यंत 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून तपासात कंपनीतील एचआर मॅनेजर निदा खान हीच सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या तरी ती फरार असून भिवंडी परिसरात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणाला आणखी गंभीर वळण देणारी बाब म्हणजे, निदा खान हिचा कथित संबंध दिल्लीतील स्फोट परकरणातील संशयित आरोपी डॉक्टर शाहीन यांच्याशी असल्याची माहिती समोर आली आहे.
या संभाव्य कनेक्शनमुळे तपासाचा दृष्टिकोन केवळ स्थानिक गुन्ह्यांपुरता मर्यादित न राहता राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने देखील केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत 8 पैकी 6 आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. तपासाची संवेदनशीलता लक्षात घेता हा संपूर्ण तपास आता अँटी टेरारिज्म स्कॉड अर्थातच एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. एटीएसचे पथक स्वतः या प्रकरणातील सर्व आरोपींची चौकशी करणार असून, नाशिक शहर पोलिसांकडून तक्रारदारांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नाशिक TCS प्रकरण – धार्मिक सक्ती, मानसिक छळ आणि ‘पत्नीला पाठवण्याच्या वक्तव्यामुळे देशभरात खळबळ
काही दिवसांपूर्वी या प्रकरणाशी संबंधित काही फोटो समोर आले होते. या फोटोंमध्ये काही कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून धर्मांतर करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणांकडून सर्व बाजूंनी सखोल चौकशी केली जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे नाशिकमध्ये संतापाची लाट उसळली असून विविध सामाजिक संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे. सकल हिंदू समाजातर्फे TCS कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संबंधित प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, या प्रकरणाशी संबंधित कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास ती तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात कळवावी. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.