वर्षावर मध्यरात्रीची भेट; जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलांच्या उपस्थितीने राजकीय चर्चांना उधाण
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाल्याचे सांगितलेले जात आहे.
Secret late-night meeting at ‘Varsha’ : राज्याच्या राजकारणात सोमवारी रात्री घडलेल्या एका भेटीने चर्चांना मोठे उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर विविध राजकीय तर्क-वितर्कांना सुरूवात झाली आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाल्याचे सांगितलेले जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी या तिन्ही नेत्यांमध्ये स्वतंत्र बैठक झाल्याची देखील चर्चा होती. त्यामुळे या भेटीचे राजकीय महत्व अधिकच वाढलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल वर्ष बंगल्यावर दाखल झाले. त्यानंतर काही वेळाने जयंत पाटील देखील तिथे पोहोचले. मात्र, मुख्यमंत्र्यांसोबत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, या भेटीबाबत वाढलेल्या चर्चांनंतर जयंत पाटील यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत कोणतीही संयुक्त बैठक झाली नसल्याचं स्पष्ट केलं. इस्लामपूर नगरपालिकेच्या नागराध्यक्षांना अपात्र ठरवण्यात आलेल्या प्रकारणांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
इंग्लंड दौऱ्यात भारताची विजयी सलामी; 259 धावांचे लक्ष्य पार करत इंग्लंडचा 6 विकेट्सने पराभव
जयंत पाटील म्हणाले, माझा सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीसी काहीही संबंध नाही. इस्लामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष अपात्रता प्रकरणासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास वर्ष निवासस्थानी पोहोचलो आणि सुमारे पाच मिनिटे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पावणे अकराच्या सुमारास बाहेर पडलो. त्या ठिकाणी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित असल्याची मला कोणतीही माहिती नव्हती. मात्र दुसरीकडे सूत्रांकडून तिन्ही नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत दीर्घ चर्चा झाल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्या स्पष्टीकरणानंतर देखील या भेटीभोवतीचे गूढ कायम आहे.
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस ऐट पवार गटाचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी मोठे विधानकेले आहे. राज्यातील तीन मोठे नेते एकाच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत असतील तर तो केवळ योगायोग असू शकत नाही. या भेटीतून महाराष्ट्रातील राजकीय परिवर्तनाची नांदी दिसत आहे, असे मिटकरी म्हणाले. याशिवाय, जयंत पाटील यांनी अलीकडेच काही आमदार आणि खासदारांसोबत चर्चा केल्याची माहिती मिळाल्याचा दावा देखील मिटकरी यांनी केला. काही लोकप्रतिनिधी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) सहभागी होण्यास इच्छुक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या या भेटीमागील खरे कारण काय, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी या भेटीने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना आणि शक्यतांना निश्चितच चालना दिली आहे. आगामी काळात या भेटीचे नेमके राजकीय परिणाम काय होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.